17 March, 2024
मुद्रणालयधारकांनी प्रसार साहित्य मुद्रीत करताना योग्य ती खबरदारी घ्यावी - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024
हिंगोली (जिमाका), दि. 17 : भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 चे कलम 127 अ अन्वये निवडणूक पत्रकाच्या व भिंतीपत्रकाच्या छपाईबाबत निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यानुसार ही छपाई कामे करण्यासाठी मुद्रणालयधारकांनी (प्रिंटींग प्रेसधारकांनी) छपाई करताना आदर्श आचारसंहितेचे पालन होईल तसेच कोणत्याही प्रकारे याचे उल्लंघन होणार नाही, याची योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे दिल्या.
जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्री. पापळकर यांनी आज नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित मुद्रकांच्या बैठकीत सूचना दिल्या. अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, उपजिल्हाधिकारी समाधान घुटुकडे आदी यावेळी उपस्थित होते.
उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी अथवा राजकीय पक्ष यांच्याकरिता छपाई करुन देताना मुद्रीत मजकुराची माध्यम प्रमाणन व संनियत्रण समितीकडून प्रमाणीत करुन घेतल्याची खात्री करावी. त्याशिवाय मुद्रीत मजकुराची छपाई करताना त्यावर प्रकाशकाचे नाव व संख्या, संपर्क क्रमांक सुस्पष्ट स्वरुपात नमूद करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी दिले. याचे उल्लंघन झाल्यास संबंधित मुद्रणालयधारकाविरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 मधील तरतुदीनुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी हिंद प्रिंटींग प्रेस, विकास प्रिंटर्स, सुरभी ऑफसेट, माऊली ऑफसेट, गुरु ग्राफिक्स आदी मुद्रणालयाचे प्रतिनिधींची उपस्थिती होती.
राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री.पापळकर यांनी आज राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांना आदर्श आचारसंहिता पालनाबाबत माहिती दिली. तसेच आचारसंहितेचे उल्लंघन होवू नये, याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. भाजपाचे फुलाजी शिंदे, आम आदमी पार्टीचे गोपाल ढोणे, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे बाबुराव गाडे, उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे विठ्ठलराव चौतमल आदी यावेळी उपस्थित होते.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment