14 March, 2024

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमाच्या नामांकीत निवासी शाळांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करावेत

हिंगोली (जिमाका), दि. 14 : शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात हिंगोली व परभणी जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना इयत्ता पहिली व दुसरीमध्ये प्रवेश देण्यासाठी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी प्रवेश अर्ज प्रकल्प कार्यालयात दि. 5 एप्रिल पासून विनामूल्य उपलब्ध आहेत. हे प्रवेश अर्ज परिपूर्ण भरुन दि. 30 एप्रिल, 2024 पर्यंत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरी जि. हिंगोली येथे जमा करावेत. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा विद्यार्थी हा अनुसूचित जमातीचा असावा. अर्जासोबत अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकित प्रत असावी. विद्यार्थी दारिद्र्य रेषेखालील असेल तर त्यासंबंधीत छायांकित प्रत व दारिद्र्य रेषा अनुक्रमांक नमूद करावा. पालकाची उत्पन्न मर्यादा ही एक लाख रुपये एवढी असून यासाठी सक्षम अधिकाऱ्याने दिलेले दि. 31 मार्च, 2025 पर्यंत वैध असणारे उत्पन्न प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. अर्जासोबत पालकांनी समतीपत्रक देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, दोन पासपोर्ट साईजचे फोटो, जन्म तारखेचा पुरावा तसेच इयत्ता दुसरीसाठी बोनाफाईड प्रमाणपत्र सोबत जोडावे. रहिवाशी प्रमाणपत्र व वैद्यकीय अधिकारी यांचे विद्यार्थी निरोगी असल्याचे प्रमाणपत्र जोडण्यात यावे. या योजनेत आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांना तसेच विधवा, घटस्फोटीत, निराधार व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील पाल्याला प्रथम प्राधान्य देण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांचे पालक शासकीय, निमशासकीय नोकरदार नसावेत. या योजनेंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांवर होणारा संपूर्ण खर्च आदिवासी विकास विभाग करणार आहे. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांच्या पाल्यास शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेत प्रवेश घेण्यासाठी प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि.हिंगोली (दूरध्वनी क्र. 02455-223033) येथे संपर्क साधावा, असे आवाहन सुनिल बारसे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि. हिंगोली यांनी केले आहे. *******

No comments: