27 March, 2024
अत्यावश्यक सेवेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या टपाली मतपत्रिकेसाठी मागणी नोंदवावी- तहसीलदार नवनाथ वगवाड
हिंगोली (जिमाका), दि.27 : अत्यावश्यक सेवेत कार्यरत अधिकारी-कर्मचारी यांना त्यांच्या मतदानाच्या व्यवस्थेसाठी टपाली मतपत्रिका उपलब्ध करुन देण्यासाठी संबंधित कार्यालय प्रमुखांनी मागणी नोंदवावी, अशा सूचना तहसीलदार नवनाथ वगवाड यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात आयोजित बैठकीत दिल्या.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024साठी अत्यावश्यक सेवेतील मतदारांना टपाली मतपत्रिका उपलब्ध करुन देण्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस अपर तहसीलदार हिमालय घोरपडे, जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते, टपाल कार्यालय अधीक्षक रमेश बगाटे, महावितरणचे नितीन पाटील, वनीकरण विभागाचे सी. डी. वाघमारे, आकाशवाणी एफएम केंद्राचे श्रीपाद पांडे, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाचे गजानन खोरणे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. नवनाथ वगवाड म्हणाले, अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचारी यांची टपाली मतपत्रिका उपलब्ध करुन देण्यासाठी संबंधित कार्यालय प्रमुखांनी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे 12 डी फॉर्मची मागणी नोंदवावी. अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी एव्हीईएस ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संबंधित कर्मचाऱ्यांचे 12 डी फॉर्मद्वारे मागणी घेऊन त्यांना मतपत्रिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. टपाली मतपत्रिकेची मागणी नोंदविताना निवडणूक विभागानी काढलेल्या आदेशाची प्रत आणि मतदार ओळख पत्राची (EPIC) एक प्रत सोबत जोडावेत. अत्यावश्यक सेवेतील मतदारांना उपविभागीय कार्यालयात दि. 21 ते 23 एप्रिल, 2024 हे तीन दिवस टपाली मतदान करण्यासाठी विशेष मतदान केंद्र सुरू करण्यात येणार आहे. टपाली मतदान झालेल्या मतपत्रिका सिलबंद करून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे जमा करण्यात येणार असल्याचे तहसीलदार श्री. वगवाड यांनी यावेळी सांगितले.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी निवडणूक आयोगामार्फत विविध पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, निवडणूक आयोग मतदानासाठी चार प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देणार आहे. यामध्ये 85 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकासाठी ईव्हीएससी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याद्वारे निवडणूक पथकातील कर्मचाऱ्यांमार्फत 12 डी फॉर्म भरून घेऊन त्यांना घरीच मतदान करता येणार आहे. तसेच दुसरी सुविधा 40 टक्क्यापेक्षा अधिक दिव्यांग असलेल्या उमेदवारांनाही घरीच मतदान करण्यासाठी ईव्हीपीडी ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तिसरी सुविधा कोविड बाधित मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी त्यांच्या घरी किंवा दवाखान्यात जाऊन मतदानाची सुविधा देण्यात येणार आहे. मात्र सध्या हिंगोली लोकसभा मतदारसंघात कोविड रुग्णांची संख्या निरंक असल्यामुळे याबाबतचे मतदान निरंक असणार आहे. चौथी सुविधा ही अत्यावश्यक सेवेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी एव्हीईएस ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. संबंधित कर्मचाऱ्यांची 12 डी फॉर्मद्वारे मागणी घेऊन त्यांना मतपत्रिका उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. अत्यावश्यक सेवेतील मतदारांना उपविभागीय कार्यालयात दि. 21 ते 23 एप्रिल, 2024 हे तीन दिवस टपाली मतदान करण्यासाठी विशेष मतदान केंद्र सुरू करण्यात येणार आहे. टपाली मतदान झालेल्या मतपत्रिका सिलबंद करून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे जमा करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
याचबरोबर निवडणूक कर्तव्यावर असल्यामुळे मतदानाला प्रत्यक्ष जावू शकत नसल्यामुळे टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. हिंगोली लोकसभा मतदार संघातील कर्मचाऱ्यांकडून 12 ए फॉर्मद्वारे व हिंगोली लोकसभा मतदार संघाबाहेरील कर्मचाऱ्यांसाठी 12 डी फॉर्मद्वारे मागणी घेऊन त्यांना टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार श्री. वगवाड यांनी दिली.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment