12 September, 2023

 

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवानिमित्त आयोजित चित्ररथाला

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दाखवली हिरवी झेंडी

 

       मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उपक्रम

       जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी जाणार चित्ररथ

 




हिंगोली (जिमाका), दि. 12 : मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हिंगोली जिल्ह्यात  चित्ररथाद्वारे मुक्ति संग्रामाचा जागर होणार आहे. यासाठी  हिंगोली नगर परिषदेच्या सहकार्याने जिल्हाधिकारी  कार्यालयाने  तयार  केलेल्या  चित्ररथाला  जिल्हाधिकारी  जितेंद्र पापळकर यांनी आज येथे हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला.

मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. या अंतर्गत मुक्तिसंग्रामावर आधारित चित्ररथाची निर्मिती करण्यात आली असून हा चित्ररथ जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी जाणार आहे. हा चित्ररथ आज हिंगोली शहरात, उद्या दि. 13 सप्टेंबर रोजी कळमनुरी, 14 सप्टेंबर रोजी सेनगाव, 15 सप्टेंबर रोजी औंढा नागनाथ आणि 16 सप्टेंबर रोजी वसमत शहरात जाऊन मराठवाडा मुक्तीसंग्रमाचा जागर करणार आहे. मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या लढ्यावर आधारित चित्रफित ह्या चित्ररथाद्वारे दाखविण्यात येणार आहे.

या चित्ररथासोबतच मशाल रॅली, प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते मशाल पेटवून मशाल रॅलीला सुरुवात करण्यात आले. या रॅलीमध्ये एनसीसी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. तसेच या चित्ररथासोबत मेरा माटी देश अभियानांतर्गत अमृत कलश हिंगोली शहरामध्ये आज फिरणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे, माजी उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार डॉ.विजय निलावार, गोंविदराव पवार यांची उपस्थिती होती.

******

No comments: