स्वामी विवेकानंद विद्यालयात
'नागरिकांची कर्तव्ये' या विषयावर वक्तृत्व स्पर्धा
हिंगोली (जिमाका), दि. 27 : येथील नेहरु
युवा केंद्र, युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने
आयोजित पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे
येथील स्वामी विवेकानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज दि. 27 सप्टेंबर रोजी
पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करुन 'नागरिकांची कर्तव्ये' या विषयावर
वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणात बोलतांना
भारतीय संविधानात दिलेली नागरिकांची कर्तव्ये प्रत्येक नागरीकांनी पाळली पाहिजेत. नागरिकांना
जशी हक्क प्राप्त होतात तसे त्यांची कर्तव्येही असतात. आपल्या हक्कांबाबत नागरिकांनी
जसे जागृत असले पाहिजे तसे आपल्या कर्तव्यांबाबतही असले पाहिजे. आपल्या राज्यघटनेचे
पालन करणे, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे. राष्ट्रीय संपत्तीचे रक्षण करणे.
भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि एकात्मता अभंग राखणे व त्याचे संरक्षण करुन राष्ट्रीय
सेवाकार्य बजावणे. भारतीय जनतेमध्ये एकोपा व बंधूभाव वाढविणे. पर्यावरणाचे रक्षण करुन
सजीव प्राण्यांबद्दल दयाबुद्धी बाळगणे. विज्ञाननिष्ठा अंगीकारुन राष्ट्र अधिकाधिक प्रगतीपथावर
नेणे यासारख्या विषयांवर स्पर्धकांनी आपली परखड मते व्यक्त केली.
या स्पर्धेत नववी ते बारावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी
सहभाग घेतला. त्यात कु .ॠतुजा विजय कऱ्हाळे प्रथम, कु.वैष्णवी बालाजी कऱ्हाळे व्दितीय,
कु.अनुराधा जयराम कऱ्हाळे तृतीय तर कु.संस्कृती प्रकाश जैस्वाल हिने प्रोत्साहन क्रमांक
मिळविला. या यशाबद्दल कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.पाटील, प्रमुख पाहुणे नेहरु युवा केंद्राचे
तालुका युवा समन्वयक प्रविण पांडे, दिपक नागरे, श्री.लोणकर यांच्या हस्ते विजेत्यांचा
शाल श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
परीक्षक म्हणून पी. एस. सुर्यवंशी, एस.
जी. कऱ्हाळे यांनी काम केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकुमार कऱ्हाळे यांनी केले
तर वाय. एम. चव्हाण यांनी आभार मानले.
यावेळी पी. आर. पाटील, बी. ए. लोणकर, एस. यु. राठोड,
एस. पी. लोंढे, आर. एस. कऱ्हाळे, एस. टी. पुरी, एन. के. टाले, पी. एस. सुर्यवंशी, वाय.
एम. चव्हाण, एम.एम.क्षिरसागर, एस. जी. कऱ्हाळे, एस. टी. पटवे इत्यादीसह विद्यार्थी
शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी एम. एम. कऱ्हाळे तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची
उपस्थिती होती.
******
No comments:
Post a Comment