21 September, 2023

 

हिंगोली जिल्हा बालविवाह मुक्त होण्यासाठी योगदान द्यावेत

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

                                                                                     



                हिंगोली (जिमाका), दि. 21 : बालविवाह निर्मूल आराखड्याची योग्य अंमलबजावणी होण्यासाठी सर्व चैम्पियन्सनी आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांकडून आराखड्यानुसार दरमहा ठरवून दिलेल्या नियोजनानुसार कामे करुन हिंगोली जिल्हा बालविवाह मुक्त होण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

जिल्हा महिला व बाल विकास विभाग, यूनिसेफ, SBC3 यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली जिल्ह्यात बालविवाह निर्मूलना संदर्भात विविध कार्यक्रम गेल्या दोन वर्षापासुन राबविले जात आहे. याचाच एक भाग म्हणून बालविवाह निर्मूलन चैम्पियन्स यांचे एकदिवशीय प्रशिक्षण येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजाभाऊ मगर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, कायदा व परिवीक्षा अधिकारी अनुराधा पंडित, चाईल्ड लाईनचे प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे तसेच शिक्षण विभाग, पंचायत विभाग, आरोग्य विभाग , आय.सी.डी. एस. , जिल्हा महिला व बाल विकास विभाग या सर्व विभागाने नियुक्त केलेले सर्व चैम्पियन्स यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले, आराखड्यानुसार दरमहा ठरवून दिलेल्या नियोजनानुसार गुगल लिंकमध्ये माहिती भरुन आपणास दिलेली जबाबदारी पार पाडावी. तसेच जिल्हास्तरावर आपणास काही मदत लागत असल्यास ती मदत सर्व यंत्रणेच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात येईल, असे सांगतिले.

या प्रशिक्षणास प्रशिक्षक म्हणून SBC3 चे टीम हेड नंदू जाधव, वरिष्ठ  जिल्हा प्रकल्प समन्वयक विकास कांबळे, जिल्हा प्रकल्प समन्वयक मोनाली धुर्वे यांची उपस्थिती होती. शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, आय. सी. डी. एस., पंचायत विभाग, जिल्हा महिला व बाल विकास विभाग या सर्व विभागाचा एकत्रित बालविवाह निर्मूलन जिल्हा कृती आराखडा तयार केला गेला आहे. या आराखड्याची योग्य अंमलबजावनी आपल्या कार्यक्षेत्रात व्हावी या उद्देशाने प्रत्येक विभागातुन चैम्पियन्स नियुक्त केले गेले आहेत. चैम्पियन्सच्या पाठपुराव्याने आणि समन्वयाने बालविवाह निर्मूलन आराखड्याची योग्य अंमलबजावनी कशी करता येईल आणि बालविवाह निर्मूलनासाठी विविध उपक्रम कसे राबविता येईल याविषयी आणि चैम्पियन्सच्या भूमिका व जबाबदारी काय असणार याविषयी एकदिवशीय प्रशिक्षण घेण्यात आले.

प्रशिक्षणाची सांगता बालविवाह निर्मूलन प्रतिज्ञा घेवून करण्यात आली. प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा बाल संरक्षण कक्ष कर्मचारी, चाईल्ड लाईन टीम जिल्हा महिला व बाल विकास विभाग हिंगोली यांनी विशेष मेहनत घेतली.

******

No comments: