सेवा महिना अंतर्गत विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम
राबवून
प्रलंबित अर्जाचा निपटारा करावा
- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
हिंगोली (जिमाका), दि. 21 : राज्य शासनाच्या विविध क्षेत्रीय कार्यालयामार्फत
राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची राज्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर माहिती
प्राप्त करुन देणे तसेच त्यांना राज्य शासनाच्या विविध योजनांचा योग्य लाभ घेता यावा.
यासाठी नागरिकामध्ये जागरुकता वाढावी, शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा
विश्वास वृध्दींगत व्हावा यासाठी विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने
यावर्षी शासनाने दि. 17 सप्टेंबर ते दि. 16 ऑक्टोबर, 2023 या कालावधीत सेवा महिना राबविण्याचा
निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्व संबंधित विभागानी आपणांकडे असलेल्या प्रलंबित अर्जाचा
निपटारा करण्यासाठी विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबवून निकाली काढावेत, असे निर्देश
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आढावा बैठकीत दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी जितेंद्र
पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली सेवा महिना राबविण्यासाठी सर्व विभाग प्रमुखाची आढावा
बैठक घेण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. पापळकर बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी
दिलीप कच्छवे, उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे, विविध विभागाचे विभागप्रमुख यांची उपस्थिती
होती.
जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी पुढे म्हणाले, दि. 17 सप्टेंबर,
2023 ते दि. 16 ऑक्टोबर, 2023 या कालावधीत सेवा महिना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला
आहे. या सेवा महिना कालावधीत आपले सरकार सेवा पोर्टल, महावितरण पोर्टल, डीबीटी पोर्टल,
नागरी सेवा केंद्र, सार्वजनिक तक्रार पोर्टल (पब्लिक ग्रिव्हियन्स पोर्टल), विभागाच्या
स्वत:च्या संकेतस्थळावरील प्राप्त झालेल्या व दि. 15 सप्टेंबर, 2023 रोजी प्रलंबित
असलेल्या सर्व अर्जांचा मोहिम स्वरुपात निपटारा करावा, अशा सूचना दिल्या.
या सेवा महिन्यामध्ये यावर्षी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
तांत्रिक अडचणीमुळे प्रलंबित असलेल्या पात्र लाभार्थ्यांना लाभ देणे, प्रलंबित फेरफार
नोंदीचा निपटारा करणे, पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वितरण, मालमत्ता हस्तातंरण
नोंद घेणे, नव्याने नळ जोडणी देणे, मालमत्ता कराची आकारणी करणे व मागणी पत्र देणे,
प्रलंबित घरगुती विद्युत जोडणीस मंजुरी देणे, मालमत्ता हस्तांतरणानंतर विद्युत जोडणीमध्ये
नवीन मालमत्ताधारकाचे नाव नोंदविणे, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत सिंचन विहिरी
करिता अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी, अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना
प्रलंबित वन हक्क पट्टे मंजूर करणे(अपिल वगळून) ,
दिव्यांग प्रमाणपत्र देणे, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र देणे, विवाह नोंदणी प्रमाणपत्र
देणे, आधार कार्ड सुविधा, पॅन कार्ड सुविधा, नवीन मतदार नोंदणी, जन्म मृत्यू नोंद घेणे व प्रमाणपत्र देणे, शिकाऊ
चालक परवाना, रोजगार मेळावा, सखी कीट वाटप, महिला बचत गटास परवानगी देणे, महिला बचत
गटास प्राधान्याने रोजगार उपलब्ध करुन देणे, लसीकरण, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, प्रशिक्षित
उमेदवारांना रोजगार उपलब्ध करुन देणे या सेवांचा अंतर्भाव आहे.
या सेवा महिन्यामध्ये प्रामुख्याने सर्वसामान्य जनतेशी निगडीत असणाऱ्या
सर्व विभाग तसेच सर्व शासकीय विभागांकडील सेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित केलेल्या
सेवा विषयी प्रलंबित कामाचा विहित कालावधीमध्ये निपटारा करण्यासाठी कार्यपध्दती निश्चित
करावी व अंमलबजावणीकरिता सर्व संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करुन देण्यात
यावी. सर्व संबंधित खात्यांच्या जिल्हा प्रमुखांनी सेवा महिन्याची यशस्वी अंमलबजावणी
करण्यासाठी नियोजन करावे. तसेच प्रगतीविषयी क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून दैनंदिन आढावा
घ्यावा आणि क्षेत्रीय भेटी द्याव्यात. शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या सेवा महिन्याविषयी
जनतेमध्ये यथोचित माहिती प्रसारित करण्यात यावी. सेवा महिना कालावधीत मान्यवरांच्या
भेटी, आयोजित शिबीरे, त्यामधील नागरिक-प्रशासनाचा सहभाग याविषयी स्थानिक प्रसार माध्यमांमधून
प्रसिध्दी देण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना
दिल्या.
******
No comments:
Post a Comment