16 September, 2023

 नोंदणी, नुतनीकरणासाठी काही खाजगी व्यक्ती कामगारांकडून पैशाची मागणी केल्यास

लाचलूचपत प्रतिबंधक विभाग अथवा जिल्हा कामगार कार्यालयाशी संपर्क साधावा

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 16  :  महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई यांच्या मार्फत बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण व विविध कल्याणकारी योजनांचे लाभ  हे संगणकीकृत प्रणालीद्वारे (Online) अर्ज केल्यावर सर्व कागदपत्रांची  छाननी, तपासणीअंती  सदरचे लाभ हे थेट कामगारांच्या बँक खात्यात जमा केले जातात. तथापि, नोंदणी नुतनीकरण करुन देणे व लाभ मिळवून देण्याबाबत काही खाजगी व्यक्ती कामगारांकडून पैसे घेत असल्याचे निदर्शनास आल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंद केलेला आहे.

सर्व बांधकाम कामगारांनी  बांधकाम कामगार नोंदणी, नुतनीकरण हे आपण स्वत: ऑनलाईन सेंटरवर जाऊन नोंदणी करावी. नोंदणी व नूतनीकरण फक्त एक रुपयामध्ये करुन देण्याचे मंडळाने घोषित केले आहे. तेव्हा  अशा कोणत्याही आमिषाला अथवा दबावाला बळी पडू नये व अशा बाबी निदर्शनास आल्यास तातडीने जवळच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभाग अथवा जिल्हा कामगार कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सरकारी कामगार अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

*****

No comments: