13 September, 2023

 

मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा होणार

 

  • दि. 14 ते 17 सप्टेंबर दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन

 

हिंगोली, (जिमाका) दि. 13  :  मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यात दि. 14 सप्टेंबर ते दि. 17 सप्टेंबर, 2023 या कालावधीत जिल्हा प्रशासनातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा दिनांकनिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे.

दि. 14 सप्टेंबर, 2023 रोजी सांय. 4.00 वाजता शिक्षण विभागाच्या वतीने मुक्ती संग्राम आधारित व्याख्यान व मुक्ती संग्रामावर आधारित कवि संमेलन घेण्यात येणार आहे. तसेच तालुकास्तरावर तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्यामार्फत मुक्ती संग्रामातील ऐतिहासिक वारसा स्थळांना , हुतात्मा स्मारकांना भेट देऊन व श्रमदानातून स्वच्छता करण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

दि. 15 सप्टेंबर, 2023 रोजी सकाळी 7.30 वाजता जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथे जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत मिनी मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात येणार आहेत. सकाळी 10 वाजता येथील पोलीस कवायत मैदानावर शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांचे सामुहिक मराठवाडा गीत, राज्यगीत व राष्ट्रगीत सामुहिक गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने येथील पोलीस कवायत मैदानावर मुक्तीसंग्रामाशी संबंधित छायाचित्र प्रदर्शनी भरवण्यात येणार आहे. सकाळी 11.00 वाजता नरसी नामदेव येथे समाज कलयाण विभागाच्या वतीने व्यसनमुक्तीवर समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात येणार आहे.  

दि. 16 सप्टेंबर, 2023 रोजी सकाळी 7.30 वाजता क्रीडा विभागामार्फत चालण्याची स्पर्धा घेण्यात येणार आहे. तर तहसीलदार यांच्यामार्फत हुतात्मा स्मारक ते हुतात्म्यांच्या घरापर्यंत गौरव रॅली काढण्यात येणार आहे.

दि. 17 सप्टेंबर, 2023 रोजी देवडा नगर येथील हुतात्मा स्मारक येथे मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सेनगाव तालुक्यातील कानिफनाथ गड येथे मंत्री महोदयांची भेट व स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करण्यात येणार आहे.

तसेच सांय. 5.00 वाजता मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव सांगता समारंभ  कार्यकम घेण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या मुक्तीसंग्रामातील हिंगोली जिल्ह्याचे योगदान यावर आधारित कॉफी टेबल बुकचे विमोचन करण्यात येणार आहे. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत, या कार्यक्रमाचा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

 

*****

 

No comments: