14 September, 2023

 

धाब्यावर अवैध मद्यविक्री केल्याने धाबा चालकास एक लाख रुपयाचा दंड

 

हिंगोली (जिमाका), दि. 14 :  सेनगाव येथील हॉटेल सातबारा धाब्यावर धाबाचालक अमोल मोतीराम मोहळे हा अवैधरित्या  मद्यविक्री तसेच मद्यप्राशनास जागा उपलब्ध करुन देत असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने संबंधितांवर वारंवार गुन्हे  दाखल करुनही या इसमाने अवैध मद्यविक्री  सुरु ठेवल्याने राज्य उत्पादक शुल्क विभागाकडून मुंबई दारुबंदी  कायद्याच्या  कलम 93 अन्वये उपविभागीय दंडाधिकारी, हिंगोली यांचेकडे बंधपत्र घेण्यासाठी प्रस्ताव दाखल केला होता.

तद्नंतर उमाकांत पारधी , उपविभागीय दंडाधिकारी, हिंगोली यांनी सदर इसमाकडून चांगल्या तर्वणुकीसाठीचे एक लाख रुपयांचे बंधपत्र घेतले होते. मात्र त्यानंतरही आरोपी अमोल मोहळे याने हॉटेल सातबारा, सेनगाव येथे अवैध मद्यविक्री सुरुच ठेवल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने या इसमाविरुध्द  नव्याने गुन्हा दाखल  करुन बंधपत्र उल्लंघनाबाबतचा प्रस्ताव उपविभागीय  दंडाधिकारी , हिंगोली यांच्याकडे सादर केला. त्यावर उपविभागीय  दंडाधिकारी श्री. पारधी  यांनी बंधपत्र भंग प्रकरणी आरोपी अमोल मोहळे  यास एक लाख  रुपये शासकीय तिजोरीत  जमा करण्याचे व तसे न  केल्यास  आरोपीस स्थानबध्द  करण्याचे  आदेश पारीत  केले.

त्याअनुषंगाने आरोपीकडून  दिनांक 12 सप्टेंबर , 2023 रोजी एक लाख  रुपयाचा दंड  वसूल करुन शासकीय तिजोरीत जमा करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या कारवाईमुळे अवैध मद्यविक्री करणाऱ्या धाबेवाल्यांचे चांगलेच धाबे दणाणल्याचे दिसून येत आहे.

राज्य  उत्पादन शुल्क विभागाकडून  अवैध मद्यविक्री करणाऱ्यांविरोधात  कलम 93 अंतर्गत  या आर्थि‍क वर्षात 30 प्रस्ताव दाखल केले असून 18 प्रकरणांत सहा लाख नव्वद हजार रुपये मुल्याचे बंधपत्र घेण्यात आले आहे.

ढाब्यावर  दारु विक्री  करणे किंवा ग्राहकांना दारु  पिण्याची  व्यवस्था  उपलब्ध  करुन देणे  तसेच त्याठिकाणी बसून दारु पिणे  महाराष्ट्र  दारुबंदी  कायद्यान्वये  गुन्हा आहे. याचे उल्लंघन  करणाऱ्या  ढाब्यांची  या विभागाकडून  सातत्याने  तपासणी सुरु असून  याचे उल्लंघन करणाऱ्या ढाबा चालक व ग्राहकांविरुध्द  कडक कारवाई केली जाईल. तसेच अवैध  हातभट्टी , मद्यविक्री  करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर  प्रतिबंधात्मक  कारवाई  करण्याबाबतचा  प्रस्ताव सक्षम प्राधिकारी यांच्याकडे सादर करण्यात येईल, असे  अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, हिंगोली यांनी एका प्रसिध्दी पत्राद्वारे कळविले आहे.  

*******

No comments: