एचआयव्ही संसर्गित व्यक्ती व देहविक्री करणाऱ्या महिलांना
सामाजिक लाभाच्या योजना प्राधान्याने द्या
- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
हिंगोली (जिमाका), दि. 09
: जिल्ह्यातील सर्व एचआयव्ही संसर्गित व्यक्ती व देहविक्री
करणाऱ्या महिलांना सामाजिक लाभाच्या योजना प्राधान्याने मंजूर कराव्यात, असे निर्देश
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची त्रैमासिक आढावा बैठक येथील
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात
आली. यावेळी समितीचे सदस्य सचिव जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा कार्यक्रम
अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी, डॉ. प्रकाश कोठुळे, डॉ. जाधव, महिला बाल कल्याणचे वाठोरे,
श्री. घुगे, श्री. इरफान कुरेशी, श्री. बनसोडे व इतर अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी यांनी एप्रिल,2023
ते जून,2023 पर्यंत एचआयव्ही एड्स नियंत्रण कार्यक्रमाच्या केलेल्या कामाचा आढावा सादर
केला. या तिमाहीमध्ये एकूण जनरल-32 व गरोदर माता-01 एचआयव्ही संसर्गित असून या सर्वांना
एआरटी उपचार सुरु आहेत.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी मागील सहा वर्षापासून जिल्ह्यात
एचआयव्ही संसर्गित पालकांपासून जन्माला आलेले सर्व बालके एचआयव्ही निगेटिव्ह असल्याने
समाधान व्यक्त केले. तसेच जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई
मार्फत पुरवठा होणारा एचआयव्ही किट्सचा तुटवडा असल्याने जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा
आरोग्य अधिकारी यांनी सदरील किट्स खरेदी करुन द्यावा, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री.
पापळकर यांनी दिले.
या बैठकीसाठी आशिष पाटील, संजय पवार, टिना कुंदणानी यांनी सहकार्य केले.
******
No comments:
Post a Comment