हिंगोली (जिमाका), दि. 21 : शासकीय वसतिगृहात
प्रवेश घेण्यास पात्र असूनही निवास, भोजन व इतर सुविधांच्या अभावामुळे पुढील शिक्षण
घेण्यास अडचणी येणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात
येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष
2025-26 साठी अर्जातील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी 30 मे 2026 पर्यंत अंतिम मुदत देण्यात
आली आहे.
या योजनेअंतर्गत इयत्ता 11 वी, 12 वी
तसेच 12 वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये विविध महाविद्यालये
व शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहातील
विद्यार्थ्यांप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य व इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध
करून घेण्यासाठी आवश्यक आर्थिक मदत थेट विद्यार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यात जमा
करण्यात येते.
शैक्षणिक वर्ष 2025-26 करीता विद्यार्थ्यांनी
https://hmas.mahait.org/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर केले
आहेत. सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालयामार्फत अर्जांची तपासणी पूर्ण करण्यात आली
असून सध्या 140 अर्ज त्रुटी पूर्ततेसाठी विद्यार्थी लॉगीनकडे प्रलंबित आहेत.
सदर अर्जांमधील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी
विद्यार्थ्यांना 30 मे 2026 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. निर्धारित मुदतीत
विद्यार्थ्यांनी त्रुटी पूर्तता न केल्यास त्यांना पुढील शैक्षणिक सत्रात अर्ज करता
येणार नाही तसेच योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते.
त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांनी आवश्यक
कागदपत्रांसह ऑनलाईन अर्जातील त्रुटी तातडीने पूर्ण करून अर्ज सादर करावा. तसेच ऑनलाईन
भरलेल्या अर्जाची प्रिंट आवश्यक कागदपत्रांसह सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालयात जमा
करावी, असे आवाहन सहायक आयुक्त समाजकल्याण यांनी केले आहे.
******
No comments:
Post a Comment