25 May, 2026

महाविद्यालयांनी शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज ३१ मेपर्यंत निकाली काढावेत

 


हिंगोली (जिमाका), दि. 25 : भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना शासनाच्या महाडिबीटी प्रणालीद्वारे राबविण्यात येत असून, सन 2019-20 ते 2025-26 या शैक्षणिक वर्षातील प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी शासनाने सर्व महाविद्यालयांना 31 मे 2026 पर्यंतची अंतिम मुदत दिली आहे.

महाविद्यालय स्तरावर सन 2019-20 चे 55, सन 2020-21 चे 192, सन 2021-22 चे 152, सन 2022-23 चे 249, सन 2023-24 चे 76, सन 2024-25 चे 184 आणि सन 2025-26 चे 581 अर्ज प्रलंबित आहेत. तसेच विद्यार्थी स्तरावर सन 2023-24 चे 101, सन 2024-25 चे 203 आणि सन 2025-26 चे 453 अर्ज प्रलंबित आहेत.

विद्यार्थ्यांनी महाडिबीटी पोर्टलवर युजरनेम व पासवर्डद्वारे लॉगीन करून आपल्या अर्जाची स्थिती तपासावी. अर्जामध्ये त्रुटी असल्यास संबंधित महाविद्यालयाशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. तसेच महाविद्यालयांनी त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांशी दोन दिवसांच्या आत संपर्क साधून पात्र अर्ज मंजूर करावेत व अपात्र अर्ज रिजेक्ट करावेत. कोणताही अर्ज लॉगीनवर प्रलंबित ठेवू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. 

शिष्यवृत्ती अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असल्यास त्यामागील कारणांची माहिती घेऊन संबंधित कागदपत्रांसह महाविद्यालयाशी संपर्क साधावा. सन 2019-20 ते 2025-26 या कालावधीतील शिष्यवृत्ती नियमानुसार पात्र अर्जच समाजकल्याण कार्यालयाकडे फॉरवर्ड करावेत. नियमानुसार अपात्र अर्ज तात्काळ रिजेक्ट करावेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

महाविद्यालय स्तरावर व विद्यार्थी स्तरावर प्रलंबित असलेले भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे पात्र अर्ज संबंधित महाविद्यालयांनी दिनांक 31 मे 2026 पर्यंत पाठवावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, हिंगोली यांनी केले आहे.

******

No comments: