हिंगोली (जिमाका), दि. 21 : महाराष्ट्र
प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम
1976, 1986 व 1999 नुसार पात्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसनविषयक प्रश्न
हाताळण्यासाठी तसेच पर्यायी जमीन व पुनर्वसित गावठाणामधील रहिवासी भूखंड संदर्भातील
तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली
जिल्हा पुनर्वसन समिती स्थापन करण्यात आली आहे.
या समितीमध्ये सदस्य म्हणून लघु पाटबंधारे
विभागाचे कार्यकारी अभियंता, हिंगोली, वसमत-कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन
अधिकारी तसेच आखाडा बाळापूर येथील उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 4 चे कार्यकारी
अभियंता यांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय संबंधित प्रकल्पग्रस्तांपैकी दोन प्रतिनिधींची
मदत व पुनर्वसन मंत्री यांच्या मार्फत नामनिर्देशन करण्यात येणार आहे. तर समितीचे सदस्य
सचिव म्हणून उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) कार्य पाहणार आहेत.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिलेल्या
आदेशानुसार समितीची बैठक दरमहा घेण्यात येणार असून, संबंधित प्रकरणांची नोंदवही व अभिलेख
तयार करून तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच प्रलंबित प्रकरणांचा
जलदगतीने निपटारा करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
या समितीमुळे प्रकल्पबाधित व्यक्तींच्या
पुनर्वसनासंदर्भातील प्रश्न सोडविण्यास गती मिळणार असून, त्यांच्या तक्रारींचे प्रभावी
व वेळेत निराकरण होण्यास मदत होणार आहे.
*******
No comments:
Post a Comment