27 May, 2026

जिल्ह्यातील महसूल व भूमी अभिलेख कामकाजाचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून आढावा

 


 

 

·         सातबारा पडताळणी, गायरान जमीन, ई-पीक पाहणी व फार्मर आयडी प्रक्रियेला गती देण्याच्या सूचना

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 27 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज महसूल व भूमी अभिलेख विभागाच्या विविध कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यातील महसूल, भूमी अभिलेख, गायरान जमीन, ई-पीक पाहणी, फार्मर आयडी, जनगणना तसेच मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ता योजनेसंदर्भातील कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख प्रशांत बिलोलीकर यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार तसेच तालुकास्तरीय भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी मिळकतींच्या दुहेरी नोंदी बंद करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मिळकतींच्या सातबारा उताऱ्यांची व पीआर कार्डची पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या. सातबारा पद्धत बंद करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करताना सर्वे क्रमांक व सिटी सर्वे क्रमांकांची अचूक पडताळणी करावी, असे त्यांनी सांगितले.

तसेच शासकीय जमिनींचे ग्राऊंड ट्रुथिंग करून संबंधित जमिनींचे फोटो व व्हिडिओ सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जिल्ह्यातील गायरान जमिनींचे क्षेत्रफळ, अतिक्रमित क्षेत्र, अतिक्रमणाचा प्रकार याबाबत सविस्तर माहिती तयार करून संबंधित जमिनींचे फोटो तसेच केएमएल फाईल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जमाबंदी आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार सर्व कामकाज वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देखील यावेळी करण्यात आल्या.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी चुकीच्या नोंदी शोधून त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले. तसेच डीसीएस ॲपची प्रभावी अंमलबजावणी, ई-पीक पाहणी, फार्मर आयडी, एसआयआर तसेच जनगणनेच्या कामांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ता योजनेअंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण व मजबुतीकरणाची कामे करण्यासाठी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून ग्रामपंचायतींचे ठराव घेण्यात यावेत व त्यानंतर प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.

याशिवाय वनपट्टाधारकांना फार्मर आयडी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही गतीने राबवावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी दिल्या.

******

No comments: