26 May, 2026

घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 ची प्रभावी अंमलबजावणी करा- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 


हिंगोली (जिमाका), दि. 26 : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 ची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण करणाऱ्या घटकांची माहिती संकलित करावी. नगर परिषद तसेच ग्रामीण भागातील कचरा साठवणुकीच्या जागा निश्चित कराव्यात. कचरा निर्मितीची कारणे व प्रमाण जाणून घेण्यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी बैठकीत दिले.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 च्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृद्धी दिवाणे, हिंगोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व नगर परिषद व नगर पंचायतींचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी गावातील घाण पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी शोषखड्ड्यांची निर्मिती करावी. कचरा साठवणुकीच्या संवेदनशील जागांची नोंद घेऊन त्या ठिकाणी विशेष उपाययोजना राबवाव्यात. याबाबत प्रत्येकाची  जबाबदारी  निश्चित करावी. कचऱ्याचे योग्य वर्गीकरण व्हावे यासाठी  प्रत्येक नागरिकांना वार्डनिहाय प्रशिक्षण देण्यात यावे. या सर्व कामांची अद्यावत माहिती शुक्रवारपर्यंत सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

भाजी मार्केट परिसरातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे. तसेच सार्वजनिक ठिकाणांवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी दिले.

*****

No comments: