• जेईई, नीट व एमएचटी-सीईटी विद्यार्थ्यांसाठी १५ जूनपर्यंत संधी
हिंगोली (जिमाका), दि. 25 : राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत कार्यरत असलेली वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी) ही संस्था राज्यातील विमुक्त जाती (व्हीजे-ए) तसेच भटक्या जमाती ब, क व ड (एनटी-बी, एनटी-सी व एनटी-डी) नॉन-क्रिमीलेअर प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी विविध उपक्रम राबवत आहे.
सन 2026-28 या शैक्षणिक सत्रासाठी ‘वनार्टी’तर्फे जेईई, नीट आणि एमएचटी-सीईटी परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी राज्यातील 36 जिल्ह्यांतील पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले असून, या उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
इच्छुक विद्यार्थ्यांना www.vanarti.in या वनार्टीच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. सुरुवातीला अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० मे २०२६ निश्चित करण्यात आली होती. मात्र, विद्यार्थ्यांकडून हेल्पलाईन क्रमांक ७८८७८८२०२६ वरून सातत्याने मुदतवाढीची मागणी करण्यात आल्याने अर्ज प्रक्रियेला आता 15 जून 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण विभागाचे मंत्री तथा ‘वनार्टी’चे अध्यक्ष अतुल सावे यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले की, शिक्षणाच्या माध्यमातून वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अशा योजनांची आवश्यकता आहे. ‘महाज्योती’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी यापूर्वी स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले असून, आता ‘वनार्टी’ संस्था विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी नवी संधी उपलब्ध करून देत आहे.
‘वनार्टी’चे प्रभारी व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ही संस्थेच्या उल्लेखनीय कार्याची पावती आहे. ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना घरबसल्या गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण आहे.
या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन प्रशिक्षणासोबतच टॅब व इंटरनेट डेटाही उपलब्ध करून दिला जाणार आहे. तसेच व्हीजेएनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ‘महाज्योती’ आणि ‘वनार्टी’ या दोन्ही संस्थांकडे स्वतंत्रपणे अर्ज करता येणार असून, निवड झाल्यानंतर कोणत्याही एका संस्थेकडून लाभ देण्यात येणार आहे.
राज्यातील अधिकाधिक पात्र विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेत आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन ‘वनार्टी’तर्फे करण्यात आले आहे.
******
No comments:
Post a Comment