हिंगोली(जिमाका), दि. 15 : जलजीवन मिशन अंतर्गत विविध नळ पाणी पुरवठा योजनेची अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करून संबंधित गावांमध्ये नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संबंधित यंत्रणांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जलजीवन मिशन अंतर्गत सुरु असलेल्या नळ पाणीपुरवठा योजनांच्या कामांचा सविस्तर प्रगती आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृद्धी दिवाणे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी, जलजीवन मिशनचे अभियंते तसेच संबंधित यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी बैठकीत विविध नळ पाणीपुरवठा योजनांची सद्यस्थिती, प्रलंबित कामे, तांत्रिक अडचणी तसेच योजनांच्या कार्यान्वयनाबाबत सखोल चर्चा करण्यात आली. कार्यान्वित होण्याच्या अंतिम टप्प्यात असलेल्या योजनांना गती देऊन नागरिकांना लवकरात लवकर शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.
तसेच, नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असलेल्या विद्युत जोडण्यांबाबतही सविस्तर आढावा घेण्यात आला. ज्या योजनांसाठी महावितरणकडून विद्युत जोडणी प्रलंबित आहे, त्या प्रकरणांमध्ये तातडीने आवश्यक कार्यवाही करून त्याबाबतचा अहवाल दि. 20 मे 2026 पर्यंत सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी जलजीवन मिशन अंतर्गत त्रयस्थ तांत्रिक तपासणी करण्यात आलेल्या योजनांचाही आढावा घेतला. तपासणीदरम्यान निदर्शनास आलेल्या सर्व त्रुटी व मुद्द्यांची पूर्तता आठ दिवसांच्या आत करून त्याबाबतचा अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले.
******
No comments:
Post a Comment