29 May, 2026

कृत्रिमरित्या इंधन टंचाई निर्माण केल्यास कठोर कारवाई - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे निर्देश

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 29 : जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा कोणताही तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी सर्व पेट्रोल पंप चालकांनी दक्षता घ्यावी. तसेच कोणीही कृत्रिमरित्या इंधनटंचाई निर्माण केल्यास त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

जिल्ह्यात निर्माण झालेल्या इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर तसेच शेतकऱ्यांना डिझेल उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्ह्यातील पेट्रोल पंप चालक व संबंधित कंपन्यांच्या विक्री अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब पाटील, जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालक तसेच संबंधित कंपन्यांचे विक्री अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्ह्यातील पेट्रोल व डिझेल साठ्याचा आढावा घेत पंप चालकांना आवश्यक सूचना दिल्या. इंधनाचा कृत्रिम तुटवडा निर्माण करणारे तसेच पेट्रोल-डिझेलचा काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

वाहनधारकांना निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक इंधन देऊ नये तसेच विना क्रमांकाच्या वाहनांना डिझेल पुरवठा करू नये, असे निर्देशही त्यांनी दिले. रुग्णालये, बँका व अन्य अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहनांना वेळेत इंधन उपलब्ध करून द्यावे, असेही त्यांनी सांगितले.

पेट्रोल-डिझेल पुरवठ्याबाबत कोणाकडून दबाव टाकला जात असल्यास त्याची तात्काळ माहिती प्रशासनाला द्यावी. तसेच कंपन्यांना अनामत रक्कम भरूनही वेळेत इंधन पुरवठा होत नसल्यास त्याबाबतही कळवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी पंप चालकांना दिले.

संकटकाळात सर्वांनी जबाबदारीने वागून देशाच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी केले.

 

******

 

No comments: