हिंगोली (जिमाका), दि. ५ : राज्यात अॅग्रीस्टॅक योजनेअंतर्गत वनपट्टे धारक शेतकऱ्यांची फार्मर आयडी नोंदणी करण्याचे काम सुरू असून या प्रक्रियेला अधिक गती देण्याचे निर्देश शासन स्तरावरून देण्यात आले आहेत. कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या शासन निर्णयानुसार सर्व जिल्ह्यांनी या मोहिमेला प्राधान्य देऊन तातडीने कार्यवाही करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
वनपट्टे धारक शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालये, उपविभागीय अधिकारी (एसडीओ) तसेच कृषी विभाग यांच्या समन्वयातून काम सुरू आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये नोंदणी प्रक्रिया सुरू असून दिनांक ४ मे २०२६ पर्यंत प्राप्त अहवालानुसार एकूण २,८०५ शेतकऱ्यांची फार्मर आयडी नोंदणी पूर्ण करण्यात आली आहे.
मात्र, काही जिल्ह्यांमध्ये नोंदणीचा वेग अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधित जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम राबवून उर्वरित शेतकऱ्यांची नोंदणी तत्काळ पूर्ण करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच ग्रामीण भागात जनजागृती करून वनपट्टे धारक शेतकऱ्यांना फार्मर आयडी नोंदणीचे महत्त्व समजावून सांगणे आवश्यक आहे.
नजीकच्या सुविधा केंद्रांमार्फत नोंदणी प्रक्रिया सुलभ करून वनपट्टे धारक शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करून अॅग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी नोंदणी मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
***
No comments:
Post a Comment