* शेतकऱ्यांनी तक्रारी व अडचणी नोंदविण्याचे कृषि विभागाचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 15 : राज्यात शेती क्षेत्राच्या दृष्टीने खरीप हंगामाला अनन्यसाधारण महत्व असून राज्यातील शेतकरी खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील असतात. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बियाणे, खते व किटकनाशके या निविष्ठांचा वेळेत, गुणवत्तापूर्ण व मुबलक प्रमाणात पुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी कृषि विभागामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
कृषि आयुक्तांनी घेतलेल्या आढावा बैठकीत राज्यातील शेतकरी, वितरक व विक्रेत्यांना क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या विविध अडचणींचे निवारण करण्यासाठी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आयुक्तालय स्तरावर विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून शेतकरी, वितरक व विक्रेत्यांसाठी संपर्कासाठी व्हाट्सअप क्रमांक ९८२२४४६६५५ उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच कृषि विभागाचा टोल फ्री क्रमांक १८००२३३४००० वर देखील संपर्क साधता येणार आहे.
यासोबतच बियाणे, खते व किटकनाशकांच्या गुणवत्ता, किंमत, साठेबाजी, लिकींग किंवा इतर संबंधित अडचणी व तक्रारी controlroom.qc.maharashtra@gmail.com या ई-मेलवरही नोंदवता येतील.
तक्रार नोंदविताना संबंधितांनी आपले नाव, संपूर्ण पत्ता, संपर्क क्रमांक तसेच अडचण किंवा तक्रारीचा संक्षिप्त तपशील नमूद करावा. सदर माहिती कोऱ्या कागदावर लिहून त्याचा फोटो व्हाट्सअप किंवा ई-मेलवर पाठवल्यास तक्रारींचे निराकरण करणे अधिक सोयीस्कर होणार असल्याचे कृषि विभागाने स्पष्ट केले आहे.
ज्या शेतकऱ्यांना व्हाट्सअपचा वापर करणे शक्य नाही, त्यांनी टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून तोंडी तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी एक भ्रमणध्वनी क्रमांक, एक टोल फ्री क्रमांक व एक ई-मेल तक्रार निवारणासाठी समर्पित करण्यात आले असून सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी व अडचणी नोंदवाव्यात, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.
******
No comments:
Post a Comment