07 May, 2026

हिंगोली येथे शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

 


* विविध प्रकारच्या प्रकरणांचा तडजोडीद्वारे निपटारा करण्याचे आवाहन



हिंगोली (जिमाका), दि. 7 : जिल्हा न्यायालय हिंगोली अंतर्गत येणाऱ्या विविध न्यायालयांमध्ये तालुका विधी सेवा समिती व वकील संघ हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. 9 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. ही लोकअदालत जिल्हा न्यायालय परिसर, हिंगोली येथे आयोजित करण्यात येणार आहे.

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये भूसंपादन व मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, वैवाहिक व कौटुंबिक वाद प्रकरणे, परक्राम्य लिखत अधिनियम कलम 138 अंतर्गत प्रकरणे, नगर परिषद, महावितरण कंपनी, बँका व पतसंस्था यांच्याशी संबंधित वादपूर्व प्रकरणे आदी खटले तडजोडीसाठी ठेवण्यात आले आहेत.

लोकअदालतीच्या माध्यमातून परस्पर सामंजस्याने व तडजोडीद्वारे प्रकरणांचा जलद निपटारा होणार असून पक्षकारांचा वेळ, पैसा व श्रमाची बचत होणार आहे. त्यामुळे संबंधित पक्षकारांनी राष्ट्रीय लोकअदालतीत उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन टी. एस. अकाली तसेच वकील संघाचे अध्यक्ष श्रीधर घुगे यांनी केले आहे.

*******

No comments: