हिंगोली (जिमाका), दि. 25 : राज्यात सध्या मतदारांच्या नोंदींची जुळवणी करण्याचे काम सुरू असून मतदार याद्या अधिक अचूक, पारदर्शक व दोषविरहित करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी तसेच सर्व पात्र मतदारांनीही या विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी राजकीय पक्षाच्या आढावा बैठकीत केले.
भारत निवडणूक आयोगामार्फत संपूर्ण देशात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण अभियान राबविण्यात येत असून, तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्र राज्याचा समावेश करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रगती चोंडेकर यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले की, राज्यात सध्या मतदारांच्या नोंदींची जुळवणी करण्याचे काम सुरू असून आतापर्यंत 72.04 टक्के मॅपिंग पूर्ण झाले आहे. मतदार याद्या अधिक अचूक, पारदर्शक व दोषविरहित करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएलए) नियुक्त करावेत. तसेच सर्व राजकीय पक्षांनी तसेच नागरिकांनी या मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी केले.
राज्यात सुरू असलेल्या जनगणना कामाचा विचार करून महाराष्ट्रासाठी विशेष वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार दि. 20 ते 29 जून 2026 या कालावधीत गणना अर्जांची छपाई व बीएलओ प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. दि. 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत बीएलओमार्फत घरभेटी देऊन गणना प्रपत्रांचे वाटप व संकलन करण्यात येईल. दि. 5 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार असून, दि. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2026 या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. त्यावरील निर्णय दि. 3 ऑक्टोबर 2026 पर्यंत घेण्यात येऊन अंतिम मतदार याद्या दि. 7 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत, अशी माहितीही जिल्हाधिकारी श्री.गुप्ता यांनी यावेळी दिली.
*******
No comments:
Post a Comment