हिंगोली(जिमाका), दि. ८ : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज शुक्रवारी (दि. ८) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय, हिंगोली येथे भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली. यावेळी रुग्णालयातील आरोग्य सुविधा, स्वच्छता, रुग्णसेवा, बाह्यरुग्ण विभाग, मनुष्यबळ उपलब्धता तसेच वैद्यकीय यंत्रणेच्या कामकाजाचा सविस्तर आढावा त्यांनी घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली एनक्यूएएस नामांकन प्राप्त करण्याच्या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत रुग्णालयातील सेवा अधिक गुणवत्तापूर्ण, पारदर्शक व रुग्णकेंद्री करण्यासाठी आवश्यक सुधारणा तातडीने करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच रुग्णालयातील स्वच्छता, रुग्ण नोंद व्यवस्थापन, औषध उपलब्धता, प्रसूती कक्ष, आपत्कालीन सेवा, प्रयोगशाळा सुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि नागरिकांना मिळणाऱ्या सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले.
जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी विविध विभागांना भेट देत तेथील सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधून उपचाराबाबत माहिती घेतली. रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांना वेळेत व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
या भेटीदरम्यान अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, प्र.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नामदेव पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक मोरे, प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल पवार, सहाय्यक अधिष्ठाता डॉ. राजहंस हणमंते, डॉ. नितीन पुरोहित, डॉ. सचिन बोधगिरे, मेट्रन बाळासाहेब चिंचकर, सहाय्यक मेट्रन श्रीमती रागिणी जोशी, श्रीमती आशा क्षीरसागर, सर्व विभाग प्रमुख तसेच अन्य अधिकारी व डॉक्टर उपस्थित होते.
******
No comments:
Post a Comment