हिंगोली(जिमाका), दि. ८ : नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प (पोकरा) टप्पा-२ अंतर्गत निवड करण्यात आलेल्या हिंगोली जिल्ह्यातील ५ गावांच्या सर्वांगीण विकासासाठी व ‘आदर्श गाव’ निर्मितीच्या अनुषंगाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेशजी अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत सेनगाव तालुक्यातील पानकन्हेरगाव, औंढा नागनाथ तालुक्यातील मेथा, हिंगोली तालुक्यातील वैजापूर, वसमत तालुक्यातील खाजमापूर वाडी तसेच कळमनुरी तालुक्यातील कांडली या गावांच्या विकास आराखड्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
अध्यक्षीय भाषणात डॉ. राकेशजी अहिरे यांनी संबंधित गावांमध्ये तातडीने पी.आर.ए. सर्वेक्षण पूर्ण करून गावनिहाय समस्या ओळखण्याच्या सूचना दिल्या. तसेच शास्त्रज्ञांच्या चमूमार्फत समस्यांच्या निराकरणासाठी ठोस कृती आराखडा तयार करून निवडलेल्या गावांचा ‘आदर्श गाव’ म्हणून विकास करण्याचे आवाहन त्यांनी केले. यासाठी आवश्यक असलेल्या अंदाजपत्रकीय निधीचा प्रस्ताव विद्यापीठाकडे सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
या बैठकीस विस्तार कृषि विद्यावेत्ता तथा एटीआयसी प्रभारी डॉ. जी. डी. गडदे, कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. पी. पी. शेळके तसेच पोकरा प्रकल्पाचे जिल्हा नोडल अधिकारी कुणाल जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय कृषि विज्ञान केंद्र, हिंगोली येथील सर्व विषय विशेषज्ञ तसेच निवड करण्यात आलेल्या पाच गावांतील पोकरा प्रकल्पाचे कर्मचारी ऑनलाईन बैठकीस उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी डॉ. पी. पी. शेळके यांनी हिंगोली जिल्ह्यातील पोकरा प्रकल्पांतर्गत नियोजित कामांची माहिती दिली. हवामान अनुकूल शेती तंत्रज्ञान, जलसंधारण व पाणी व्यवस्थापनावर विशेष भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शेवटी डॉ. पी. पी. शेळके यांनी आभार मानले.
********
No comments:
Post a Comment