हिंगोली(जिमाका), दि. 8 : हिंगोली जिल्ह्यात सन 2025-2026 या कालावधीतील पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यानुसार विविध उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून, टंचाई परिस्थिती कुशलतापूर्वक हाताळण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. जिल्ह्यात एकूण 543 उपाययोजनांना मंजुरी देण्यात आली असून, त्याअंतर्गत विविध स्तरांवर कामे सुरू आहेत.
खाजगी विहीर अधिग्रहण योजनेअंतर्गत 302 गावांमध्ये एकूण 336 विहिरी/बोअर अधिग्रहित करून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या 26 गावांमध्ये 28 विहिरी/बोअर अधिग्रहित करून नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविण्यात येत आहे.
टँकरद्वारे पाणीपुरवठा योजनेअंतर्गत 2 शासकीय टँकरच्या माध्यमातून 3 वाड्या/तांड्यांना नियमित पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच नविन विंधन विहिरी घेण्याच्या योजनेअंतर्गत 28 गावांमध्ये 36 नवीन विंधन विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, संबंधित कामांची पुढील कार्यवाही जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात येत आहे.
ग्रामीण भागातही या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी तालुकास्तरीय यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी नळ पाणीपुरवठा योजनांच्या स्रोताजवळ रिचार्ज शॉफ्ट, बंधारे आदी जलसंधारणात्मक उपाययोजनांचे नियोजन करण्यात येत आहे.
जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या या उपाययोजनांमुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. तसेच सन 2025 मध्ये जिल्ह्यात 142.6 टक्के पर्जन्यमान झाल्यामुळे अतिरिक्त नाविन्यपूर्ण योजनांची आवश्यकता भासली नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, आवश्यकतेनुसार टंचाई कालावधीत परिस्थितीनुरूप विविध उपाययोजना सातत्याने राबविण्यात येत असल्याची माहितीही प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
******
No comments:
Post a Comment