07 May, 2026

जिल्हा वार्षिक योजनेचे प्रस्ताव जून अखेरपर्यंत सादर करावेत - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 

* विविध विभागांच्या कामांचा आढावा; आकांक्षित जिल्ह्याच्या निर्देशांकानुसार प्रभावी अंमलबजावणीच्या सूचना




हिंगोली (जिमाका), दि. 7 : जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षातील कामांचे प्रस्ताव जून अखेरपर्यंत सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी ग. गो. चितळे, प्रदीप नळगीरकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी सांगितले की, सन 2025-26 मधील दायित्वाच्या कामांसाठी निधी मागणीचे प्रस्ताव पाठविताना जीओ-टॅग केलेले छायाचित्र जोडणे आवश्यक आहे. तसेच सन 2025-26 मधील पूर्ण झालेली व प्रगतीपथावरील कामांचा त्यांनी विभागनिहाय आढावा घेतला. पूर्ण झालेल्या कामांची उपयोगिता प्रमाणपत्र व काम पूर्णत्वाची प्रमाणपत्रे तात्काळ सादर करावीत, असे निर्देशही त्यांनी दिले.

सन 2026-27 च्या निधी मागणी प्रस्तावांसोबत युआयडी देणे बंधनकारक असून, काम सुरू करण्यापूर्वीचे जीओ-टॅग छायाचित्र अपलोड करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कृषी विभागाने आपल्या विभागातील कामे इतर एजन्सीकडे न देता स्वतः प्रस्तावित करावीत तसेच चालू वर्षातील तांत्रिक मान्यतेचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

जनसुविधा व नागरी सुविधा योजनेंतर्गत स्मशानभूमीची कामे प्राधान्याने प्रस्तावित करावीत. शिक्षण विभागाने आदर्श शाळा योजनेसाठी पात्र शाळांची यादी तयार करून शाळांमध्ये स्वच्छतागृहांची कामे प्रस्तावित करावीत. सर्व शाळांमध्ये 100 टक्के स्वच्छतागृह सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी नियोजन करावे. स्वच्छतागृह प्रस्ताव सादर करताना कामांची द्विरुक्ती होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

क्रीडा विभागाने व्यायामशाळा व क्रीडांगण विकासाची कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी ग्रामीण भागातील कामे जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत तर नागरी भागातील कामे संबंधित मुख्याधिकाऱ्यांमार्फत करावीत. कौशल्य विकास विभागाने कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम प्रभावीपणे राबवावेत, असेही त्यांनी सांगितले.

सार्वजनिक आरोग्य विभागाने औषध खरेदी करताना उपलब्ध शिल्लक साठा, वापर व आवश्यकतेचा आढावा घेऊन सविस्तर प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या माध्यमातून सादर करावा. जिल्हा रुग्णालयातील अंतर्गत कामे तसेच एनक्यूएएस प्रमाणित आरोग्य संस्था तयार करण्यासाठी आवश्यक निर्देशांकांनुसार कामांचे प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम, क्रीडा, शिक्षण, आरोग्य, नगर विकास, कौशल्य विकास, पशुसंवर्धन, मत्स्यविकास, ग्रामविकास आदी विभागांच्या कामांचा सविस्तर आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

राज्य शासनाने हिंगोली जिल्ह्याला आकांक्षित जिल्हा म्हणून घोषित केले असून, जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा नियमित आढावा घेऊन शासनाने निश्चित केलेल्या निर्देशांकानुसार प्रभावी कामे करावीत. संबंधित माहिती गुगलशीटवर अपलोड करून सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी दिले.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांचा साधना सप्ताहात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

******

No comments: