30 December, 2022

 

जिल्ह्यात लम्पी आजाराने आतापर्यंत 145 जनावरांचा मृत्यू

लम्पी आजाराने मृत झालेल्या 77 जनावरांच्या पालकांना दिला अर्थसहाय्य

 

            हिंगोली (जिमाका), दि. 30 : जिल्ह्यात लम्पी आजाराचा शिरकाव होत असून लम्पी आजाराने बाधित जनावरांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पशुपालकांनी जनावरांची काळजी घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

जिल्ह्यांत लम्पी आजारामुळे आतापर्यंत 33 गाई, 37 बैल व 93 वासरे असे एकूण 163 जनावरांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 32 गाई, 37 बैल व 86 वासरे असे एकूण 155 मृत झालेल्या जनावरांच्या पालकांचे अर्थसहाय्यासाठी प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.

प्राप्त 155 प्रस्तावापैकी 29 गाई, 36 बैल व 80 वासरे असे एकूण 145 मृत जनावरांचे प्रस्ताव समितीने मंजूर केले आहेत. या मंजूर 145 प्रस्तावापैकी 17 गाई, 16 बैल व 44 वासरे अशा एकूण 77 मृत जनावरांच्या पालकांना अर्थसहाय्य अदा करण्यात आले आहे.

उर्वरित 23 जनावरांचे प्रस्ताव निकाली काढण्यासाठी बीडीएसवर 5 लाख रुपयाची रक्कम प्रापत झाली असून याचे देयक कोषागारात सादर करण्यात आले आहे. हे देयक मंजूर झाल्यानंतर 23 जनावरांचे अनुदान त्वरित अदा करण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त उर्वरित 63 जनावरांचे अर्थसहाय्य देण्यासाठी शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली असून बीडीएसवर रक्कम प्राप्त होताच बैठक घेऊन त्वरित पशुपालकांना रककम अदा करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, हिंगोली यांनी दिली आहे.

 

*****

 

बांधकाम कामगारांनी सुरक्षा संच व अत्यावश्यक संचाचा लाभ घेण्यासाठी

नोंद करण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 30 :  येथील सरकारी कामगार अधिकारी कार्यालयांतर्गत असलेल्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांना मंडळामार्फत सुरक्षा संच व अत्यावश्यक संच वाटप चालू असून जुलै ते सप्टेंबर, 2022 या कालावधीत नोंदणी, नुतनीकरण केलेल्या (जिवित) बांधकाम  कामगारांनी दि. 01 जानेवारी, 2023 पासून सुरक्षा संच व अत्यावश्यक संच घेण्यासाठी सरकारी कामगार अधिकारी तथा महाराष्ट्र शासन व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मातोश्री बिल्डींग, प्लॉट क्र. 11 गोळकुधाम सोसायटी, एनटीसी, हिंगोली येथे बांधकाम कामगार नोंदणी पावती घेऊन नोंद करावी व किट वाटपाची तारीख निश्चित करुन घ्यावी. हे सुरक्षा संच व अत्यावश्यक संच निशुल्क असून कोणत्याही अमिशाला बळी न पडता कामगारांनी स्वत: या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन टी. ई. कराड, सरकारी कामगार अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

******

 

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक कार्यक्रम जाहीर

 

हिंगोली (जिमाका), दि. 30 : भारत निवडणूक आयोगाचे पत्रान्वये दि. 29 डिसेंबर 2022 पासून औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणूक कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

             गुरुवार, दि. 5 जानेवारी, 2023 रोजी निवडणूक अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. गुरुवार, दि. 12 जानेवारी, 2023 ही नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. शुक्रवार,दि. 13 जानेवारी, 2023 रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी होईल. सोमवार, दि. 16 जानेवारी, 2023 रोजी नामनिर्देशन पत्र माघार घेण्याचा अंतिम दिवस. सोमवार, दि. 30 जानेवारी, 2023 रोजी सकाळी 8:00 ते दुपारी 4:00 पर्यंत मतदान होणार आहे. गुरुवार, दि. 2 फेब्रुवारी, 2023 रोजी मतमोजणी केली जाणार आहे.

*****

 

आदिवासी विद्यार्थ्यांना एकलव्य शाळेत प्रवेशासाठी आवाहन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 30 :  हिंगोली व परभणी जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, विनाअनुदानित शाळा, जिल्हा परिषद शाळा, इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 6 वी, 7 वी, 8 वी व 9 वी मध्ये शिकत असलेल्या अनुसूचित जमाती, आदिम जमातीच्या (आदिवासी) विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यातील केंद्र शासनाद्वारे संचलित शासकीय एकलव्य शाळेत प्रवेश घेण्यासाठी शासनाने प्रवेश पात्रता परीक्षा आयोजित केलेली आहे. ही परीक्षा दि. 26 फेब्रुवारी, 2023 रोजी घेण्यात येणार आहे.   

ज्या विद्यार्थ्यांना एकलव्य शाळेत प्रवेश घेण्याची इच्छा आहे, अशा विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील मुख्याध्यापक यांच्याकडून प्रवेश अर्ज प्राप्त करुन घ्यावा व सदर अर्ज भरुन मुख्याध्यापक यांच्याकडेच द्यावा.

सर्व शाळेतील मुख्याध्यापकांनी अनुसूचित जमाती, आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांना एकलव्य शाळेत प्रवेशासाठी प्रोत्साहित करावे. प्रवेश पात्रता परीक्षेचे आवेदन पत्र एकात्मिक आदिवासी विकास प्रकलप कार्यालय कळमनुरी जि.हिंगोली येथून प्राप्त करुन घ्यावेत. आवेदन पत्र शासकीय आश्रमशाळा, जामगव्हाण, गोटेवाडी, बोथी, पिंपळदरी, शिरडशहापूर येथे उपलब्ध आहेत.

प्रवेश पात्रता परीक्षेसाठी पालकांचे वार्षिक उत्पन्न 6 लाख रुपयापेक्षा जास्त नसावे. सक्षम अधिकाऱ्यांचे दिलेले अनुसूचित जमाती, आदिम जमातीचे प्रमाणपत्र (छायांकित प्रत), पालकाचे रहिवाशी प्रमाणपत्र, विद्यार्थ्याचे शाळेचे बोनाफाईड आवश्यक आहे.

संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी प्रवेश पात्रता परिक्षेचे आवेदन पत्र दि. 10 फेब्रुवारी, 2023 पर्यंत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि. हिंगोली येथे सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि. हिंगोली यांनी केले आहे.

 

******

29 December, 2022

 

विवक्षित कामासाठी संशाधन व्यक्ती पदासाठी

6 जानेवारी पर्यंत अर्ज करावेत

 

हिंगोली (जिमाका), दि. 29 :  आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न उद्योगांचे उन्नयन योजना (PMFME) या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत राज्य नोडल एजन्सीच्या वतीने जिल्हास्तरावर लाभार्थ्यांना पाठपुरावा, हाताळणीस सहाय्य देण्यासाठी संशाधन व्यक्तीची नामिकासूची (Panel of Resource Person) तयार करावयाची आहे. त्यासाठी या योजनेच्या मार्गदर्शक सुचनेतील अटी व शर्तीनुसार बंद लिफाफ्यातून अर्ज मागविण्यात येत आहेत.

संशाधन व्यक्ती (Resource Person)  या पदासाठी अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 6 जानेवारी, 2023 राहील. सदर पदासाठी संस्था पात्र असणार नाही. योजनेच्या मार्गदर्शक सूचना, अर्जाचा नमुना, सविस्तर पात्रता पारिश्रमिक (मानधन) व इतर अटी व शर्ती या जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, हिंगोली यांच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. तसेच कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर सुध्दा उपलब्ध आहेत.

संशाधन व्यक्ती (Resource Person)  या पदासाठी शैक्षणिक अर्हता विद्यापीठ/संस्था यांच्याकडील अन्न तंत्रज्ञान/ कृषि अभियांत्रिकी मधील पदव्युत्तर/पदवी इत्यादी किंवा कृषि व कृषि संबंधित पदव्युत्तर/पदवी इत्यादी किंवा इतर कोणत्याही शाखेतून पदव्युत्तर/पदवी आवश्यक आहे.

या पदासाठी सेवानिवृत्त बँक/शासकीय अधिकारी, सनदी लेखापाल (Chartered Accountant)/सल्लागार संस्था, बँक मित्र, वैयक्तीक व्यवसायिक/व्यक्ती, विमा प्रतिनिधी, विद्यापीठ/संस्था यांच्याकडील अन्न तंत्रज्ञान/कृषि अभियांत्रिकी मधील पदव्युत्तर/पदवीधारक, कृषि व कृषि संबंधित पदव्युत्तर/पदवीधारक, इतर कोणत्याही शाखेतून पदव्युत्तर/पदवीधारक यानुसार प्राधान्यक्रम असणार आहे. तसेच वरील सर्वांना अन्न व कृषि प्रक्रियेतील उद्योग उभारणीचा सविस्तर प्रकल्प अहवाल बनविणे तसेच बँकेशी पाठपुरावा करुन मंजूर करुन घेणे याबाबत अनुभव असणे आवश्यक आहे, असे शिवराज घोरपडे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे  केले आहे.

******

 

 

युरिया खताची एमआरपीपेक्षा जादा दराने विक्री होत असल्यास

कृषि विभागांशी संपर्क साधण्याचे आवाहन

 

·         रब्बी हंगामासाठी जिल्ह्यात युरिया खताचा 12 हजार 260 मेट्रिक टन इतका आवंटन मंजूर, आज अखेर  1828 मेट्रिक टन खताचा पुरवठा

·         गहु व इतर रब्बी पिकांसाठी शेतकऱ्यांनी प्राधान्याने नॅनो युरियाचा वापर करावा

 

हिंगोली (जिमाका), दि. 29 :  जिल्हयात सद्य परिस्थितीत रब्बी पिकांची मुख्यतः गहु, हरभरा तसेच इतर पिके यांची पेरणी पूर्ण झालेली असून सर्व रब्बी पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. सध्या शेतकरी रब्बी पिकांना खताची मात्रा देत आहेत. कृषि विभागाकडून रब्बी हंगाम-2022 साठी युरिया खताची 12 हजार 260 मेट्रिक टन इतके आवंटन मंजूर झाले आहे.  मंजूर आवंटनानुसार दि. 01 ऑक्टोबर, 2022 पासून आज अखेर 1828 मेट्रिक टन इतका युरिया खताचा जिल्ह्यात पुरवठा झालेला आहे. सद्य परिस्थितीत शेतकन्यांकडुन मोठया प्रमाणावर युरिया खताची मागणी होत आहे.

जिल्हयात काही प्रमाणात युरिया खताचा साठा आहे. कृषि विद्यापिठाच्या शिफारसीनुसार हरभरा पिक हे नत्र स्थिरीकरण करणारे द्विदल पिक असून हरभरा पिकास शेतकऱ्यांनी युरियातून नत्र खताचा दुसरा हप्ता देण्याची आवश्यकता नाही. काही शेतकरी युरीया खत देत असल्याचे निदर्शनास आले आहे. हरभरा पिकास युरिया खत दिल्यामुळे पिकाची फक्त कायीक वाढ जास्त होऊन त्याची रोगप्रतिकारक क्षमता कमी होऊन उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असते. तसेच शेतकऱ्याचा उत्पादन खर्च वाढून शेतकऱ्याचा फायदा होण्याऐवजी नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हरभरा पिकास युरीया खताचा वापर दुसऱ्या हप्त्याच्या स्वरुपात करु नये. तसेच गहु व इतर रब्बी पिकांसाठी शेतकऱ्यांनी प्राधान्याने नॅनो युरियाचा वापर करावा. नॅनो युरिया जिल्ह्यात मुबलक प्रमाणावर उपलब्ध आहे. तसेच येत्या काही दिवसात युरिया खताचा पुरवठा जिल्हयात होणार आहे. तसेच शेतकऱ्यांनी युरिया खताची एमआरपी पेक्षा जादा दराने खरेदी करु नये. जिल्ह्यात कोठेही युरिया खताचे एमआरपी पेक्षा जादा दराने विक्री होत असेल तर तात्काळ कृषि विभागाशी संपर्क साधण्यात यावा, असे आवाहन शिवराज घोरपडे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, हिंगोली यांनी  केले आहे.

******

 

 

जिल्हा कृषि प्रदर्शन व राज्यस्तरीय हळद महोत्सवाचा

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडून आढावा

 



            हिंगोली (जिमाका), दि. 29 :  जिल्हा कृषि प्रदर्शन व राज्यस्तरीय हळद महोत्सवाचे दि. 13 जानेवारी ते 16 जानेवारी, 2023 या कालावधीत आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दि. 13 जानेवारी, 2023 रोजी  होणार आहे. यावेळी पालकमंत्री व इतर मंत्रीमहोदयांची उपस्थिती राहणार आहे. हे महोत्सव यशस्वी करण्यासाठी वेगवेगळ्या 15 समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या सर्व समितीने केलेल्या कामकाजाचा व नियोजनाचा आढावा आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी घेतला.

            जिल्हा कृषी प्रदर्शन व राज्यस्तरीय हळद महोत्सवाच्या आयोजनाच्या पूर्वतयारीबाबत विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आली. यावेळी अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे, आत्माचे प्रकल्प संचालक युवराज शहारे, हळद संशोधन व प्रक्रिया केंद्राचे व्यवस्थापकीय संचालक रविशंकर चलवदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एल. बोंद्रे, कृषि विकास अधिकारी निलेश कानवडे, सर्व तालुका कृषि अधिकारी यांच्यासह तसेच सर्व समितीचे अध्यक्ष, सदस्य, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. 

            यावेळी  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्हा कृषि प्रदर्शन व राज्यस्तरीय हळद महोत्सवात प्रदर्शन स्टॉल लावणे, वाहन व्यवस्था, पार्कींग, प्रदर्शनाच्या ठिकाणी वीज, पाणी, फिरते शौचालय यासह आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना दिल्या. तसेच या महोत्सवानिमित्त चार दिवस राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रम, चर्चासत्र, उपक्रमाची माहिती घेऊन आपणास सोपविण्यात आलेली जबाबदारी वेळेत व यशस्वीपणे पार पाडावी, अशा सूचनाही श्री. पापळकर यांनी  दिल्या. 

****

 

एकात्मिक अन्नद्रव्य व कीड व्यवस्थापन या बाबीच्या निविष्ठांसाठी

शेतकऱ्यांनी अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

            हिंगोली (जिमाका), दि. 29 :  विविध केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत पिकांसाठी सन 2022-23 या योजनेअंतर्गत रब्बीसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन व एकात्मिक कीड व्यवस्थापन या बाबीसाठी पीक संरक्षण औषधे, तणनाशके, जिप्सम, जैविक खते, जैविक कीड नियंत्रण या निविष्ठांसाठी शेतकऱ्यांना किंमतीच्या 50 टक्के किंवा कमाल 500 रुपये प्रती हेक्टर याप्रमाणे लाभ देय आहे.

            सध्या रब्बी हंगामातील पिकांवर कीड रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकऱ्यांना कृषि विद्यापीठाच्या शिफारशीनुसार निविष्ठा खरेदी केल्यास राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, कडधान्य व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान सन 2022-23 उत्पादन वाढीसाठी निविष्ठा पुरवठा घटक-प्रकल्पाबाहेरील या बाबीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार खालीलप्रमाणे अनुदान अनुज्ञेय आहे.

            सूक्ष्म मुलद्रव्ये, जिप्सम, जैविक खते एकूण किमतीच्या 50 टक्के कमाल 500 रुपयाच्या मर्यादेत दोन हेक्टर क्षेत्राकरिता देय आहे. तसेच पिक संरक्षण औषधे, तणनाशके, जैविक कीड नियंत्रण इत्यादी किंमतीच्या 50 टक्के किंवा कमाल 500 रुपये हेक्टरी देय आहे. एका शेतकऱ्याला कमाल 2 हेक्टर मर्यादेत लाभ देय आहे.

            हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वरील निकषानुसार निविष्ठा खरेदी करुन त्याची खरेदी पावती, सातबारा, आधारकार्ड व बँक खात्याचा तपशील इत्यादी कागदपत्रासह आपला अर्ज संबंधित तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी कार्यालयाकडे रब्बी हंगामासाठी दि. 30 जानेवारी, 2023 पूर्वी सादर करावेत. त्यानुसार त्यांना अनुज्ञेय असलेले अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट लाभ हस्तांतर पध्दतीने वर्ग करण्यात येईल. या योजनेचा लाभ  जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन शिवराज घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, हिंगोली  यांनी  केले आहे.   

*****

28 December, 2022

 

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयास स्वच्छतेचा प्रथम पुरस्कार

 


            हिंगोली (जिमाका), दि. 28 :  हिंगोली नगर परिषदेच्या वतीने मुख्याधिकारी  अरविंद मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली माझी वसुंधरा अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण मोहिम राबविण्यात आली होती. या अभियानात सर्वात स्वच्छ कार्यालयाचा प्रथम पुरस्कार सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय,हिंगोली यांना मिळाला आहे.           

त्यानिमित्त हिंगोली नगर परिषदेमार्फत आयोजित समारंभात सर्वात स्वच्छ कार्यालय प्रथम पारितोषक पुरस्कार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या हस्ते समाज कल्याणचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांना नुकताच प्रदान करण्यात आला आहे.  

            यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंढे व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.         

*****

27 December, 2022

 

सर्व शासकीय कार्यालयात तंबाखू विरोधी कायद्याची अंमलबजावणी  करावी

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश

 

 


हिंगोली (जिमाका), दि. 27 :  सर्व शासकीय कार्यालयांनी आपल्या कार्यालयात तंबाखू विरोधी निर्देश फलक लावावेत व तंबाखू विरोधी कायद्याची (कोटपा-2003) अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी बैठकीत दिले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा स्तरीय समन्वय समितीची बैठक पार पडली. त्यावेळी श्री. पापळकर बोलत होते. 

            जिल्हाधिकारी श्री. पापळकर पुढे म्हणाले, शिक्षण विभागाने येत्या काळात सर्व शाळेत तंबाखू विरोधी  निर्देश फलक लावावेत. प्रामुख्याने जिल्ह्यातील सर्व शाळा तंबाखू मुक्त करावा व त्याबाबतचा सर्व शाळांचा अहवाल संकलित करावा. शहरातील पान टपऱ्यांसाठी परवाना कार्यवाही करताना नगर परिषदेने तंबाखू विरोधी कायद्याची अंमलबजावणी करावी. तसेच तंबाखू नियंत्रण पथकांनी कोटपा कायद्याचे उल्लंघन होत असलेल्या ठिकाणी वेळोवेळी धाडी टाकाव्यात, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

या बैठकीस मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे विभागीय व्यवस्थापक अभिजीत संघई, डॉ. मयूर निंबाळकर, कुलदीप केळकर, आनंद साळवे, प्रशांत गिरी व जिल्ह्यातील विविध शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 

*****

 

बाल विवाह प्रतिबंधक अधिसूचनेचे काटेकोरपणे पालन करावेत

                                                        - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश

 


हिंगोली (जिमाका), दि. 27 :  जिल्ह्यात बाल विवाह समूळ नष्ट करण्यासाठी बाल विवाह प्रतिबंध अधिनियम 2006 च्या कलम 19 द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन आणि महाराष्ट्र बाल विवाह प्रतिबंध नियम, 2008 चे अधिक्रमण करुन शासनाने काही नवीन नियम करण्यात आले आहेत. त्यानुसार प्रत्येक शाळेत जर विद्यार्थी 15 दिवसापेक्षा जास्त दिवस गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांची रजिस्टरला नोंद ठेवावी. राष्ट्रगीत झाल्यानंतर बाल विवाह प्रतिज्ञेचे वाचन करावे, तसेच प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात बाल विवाह प्रतिज्ञेचे फलक लावावेत व बाल विवाह प्रतिबंध अधिसुचनेनुसार सर्व नियमांचे जिल्ह्यात काटेकोरपणे पालन करावेत, असे निर्देश सर्व संबंधित यंत्रणांना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा बाल संरक्षण कक्षाची कामकाज आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी श्री.पापळकर बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, जिल्हा कार्यक्रम अधिकारी गणेश वाघ, शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी यांची उपस्थिती होती.

            या बैठकीमध्ये कक्षाने जिल्ह्यातील विविध ठिकाणी घेण्यात आलेल्या दत्तक नियमावली 2022 ची प्रचार व प्रसिध्दीची तसेच अनाथ पंधरवाडा व बालकांविषयीच्या कायद्याची जाणीव जागृती कार्यक्रम, बाल विवाह निर्मूलनासाठी मशाल फेरी, कॅन्डल मार्च, भारुडाच्या माध्यमातून व शाळेतील विद्यार्थ्यांना बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा देवून जनजागृती कार्यक्रमाची माहिती सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांनी दिली. तसेच मिरॅकल फाऊंडेशन मार्फत निरीक्षणगृह, बालगृहातील बालकांसाठी लाईफ बूक विषयी सत्र घेण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.  

या बैठकीस पोलीस अधिक्षक यांचे प्रतिनिधी, जिल्हा कामगार अधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, बाल न्याय मंडळ संदस्य, बाल कल्याण समिती अध्यक्ष / सदस्य, चाईल्ड लाईन टीम मेंबर, तसेच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) गणेश मोरे,  कायदा व परिविक्षा अधिकारी अॅड. अनुराधा पंडित, बाल संरक्षण अधिकारी (संस्था बाह्य) जरीबखान पठाण, सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे, समुपदेशक रेशमा पठाण, सचिन पठाडे, क्षेत्र कार्यकर्ता अनिरुध्द घनसावंत आदी उपस्थित होते.

 

******

 

कबड्डी स्पर्धेत हिंगोलीचा एक संघ विजेता तर दुसरा संघ उपविजेता

विभागीय शालेय कबड्डी स्पर्धेचा समारोप ; 21 संघाचा सहभाग





 

हिंगोली (जिमाका), दि. 27 :  शालेय गटातील विभागस्तरीय कबड्डी स्पर्धेत मुलांमध्ये सतरा वर्षे वयोगटात हिंगोलीच्या संघाने बाजी मारली. तर चौदा वर्षे वयोगटात हिंगोलीचा संघ उपविजेता ठरला. अत्यंत चुरशीच्या लढतीत हिंगोलीने चमकदार खेळी केली. शालेय गटात विभागातील 21 संघाने सहभाग घेतला होता. स्पर्धेचा समारोप मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. 

हिंगोली येथील रामलीला मैदानावर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा कबड्‌डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय गटातील विभागस्तरीय दोन दिवशीय कबड्डी स्पर्धेचा समारोप सोमवार  दि. 26 डिसेंबर रोजी संपन्न झाला. मुलांच्या गटातील स्पर्धेत अत्यंत चुरशीच्या लढती पहावयास मिळाल्या. तीन मैदानावर तीन गटात स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत चौदा वर्षीय मुले विद्यानिकेतन हायस्कुल गंगाखेड, जि.परभणी या संघाने हिंगोली जिल्ह्यातील जि.प.प्रशाला सवना ता.सेनगाव या संघाचा पराभव केला. हिंगोलीला चौदा वर्षे वयोगटात उपविजेते पद मिळाले आहे. सतरा वर्षे वयोगटात हिंगोली जिल्ह्यातील रेणुका माता विद्यालय, चिंचोली ता.औंढा नागनाथ या संघाने प्रतिस्पर्धी संघ बीड जिल्ह्यातील निवृत्तीराव धस विद्यालय जांमगाव ता.आष्टी या संघाचा अत्यंत चुरशीच्या लढतीत पराभव केला. हिंगोली जिल्ह्याला सतरा वर्षे वयोगटात विजेते पद मिळाले आहे. एकोणवीस वर्षे वयोगटात बीड जिल्ह्यातील निवृत्तीराव धस विद्यालय, जांमगाव ता.आष्टी या संघाने जालना जिल्ह्यातील जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वाडी बु. , ता.भोकरदन या संघाचा पराभव केला.                                  विजेत्या व उपविजेत्या तीनही गटातील संघातील खेळांडु व प्रशिक्षकांचा सत्कार निवृत्त शिक्षण अधिकारी शिवाजी पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव प्रा.नवनाथ लोखंडे, आयोजन समितीचे प्रमुख तथा कबड्‌डी असोसिएशनचे कोषाध्यक्ष मेजर प्रा.पंढरीनाथ घुगे, संयोजन समितीचे समन्वयक कल्याण देशमुख, क्रीडा अधिकारी बसी, संजय बेत्तीवार यांनी केला.

स्पर्धा यशस्वीतेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा कबड्डी असोसिएशन, तालुका खो-खो असोसिएशन यांचे पदाधिकारी, पंच समिती, आयोजन समितीने परिश्रम घेतले. हिंगोली जिल्ह्यातील विजेत्या संघाचे प्रशिक्षक माधव चव्हाण, कल्याण पोले यांच्यासह खेळांडुचे अभिनंदन करण्यात आले. दोन दिवशीय स्पर्धेला क्रीडा प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद होता.

 

****

 

जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. भाऊसाहेब ऊर्फ पंजाबराव देशमुख यांची जयंती साजरी


 

हिंगोली (जिमाका), दि. 27 :  डॉ.भाऊसाहेब ऊर्फ पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, नायब तहसीलदार डी. एस. जोशी  यांच्यासह प्रशासकीय इमारतीमधील सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*****

26 December, 2022

 

हिंगोली जिल्हा ग्रंथ वैभव दालनासाठी पुस्तके भेट देण्याचे आवाहन

 

            हिंगोली (जिमाका), दि. 26 :  हिंगोली जिल्ह्यातील सर्व साहित्यिकांचे प्रकाशित साहित्य/ ग्रंथ एकत्रित करुन नवोदित साहित्यिकांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळण्यासाठी संदर्भ साहित्य म्हणून शासकीय जिल्हा ग्रंथालय हिंगोली येथे लवकरच  " हिंगोली जिल्हा ग्रंथ वैभव दालन  सुरु करण्यात येणार आहे.  

हिंगोली जिल्ह्यातील सर्व सन्माननीय साहित्यिकांनी त्यांचे सर्व प्रकाशित ग्रंथ, साहित्यकृतीच्या दोन प्रती जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नेहरु नगर, रिसाला नाका हिंगोली येथे भेट स्वरुपात दि. 25 फेब्रुवारी, 2023 पर्यंत पाठविण्यात यावेत, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे.

 हिंगोली जिल्ह्यातील साहित्यिकांचे सर्व साहित्य एका ठिकाणी संदर्भासाठी सर्व जनतेला व नवोदित साहित्यिकांना उपलब्ध होऊ शकेल. तसेच सर्व प्राप्त ग्रंथ, साहित्यकृती एकत्रित करुन दि. 27 फेब्रुवारी, 2023  रोजी  " मराठी भाषा गौरव दिना निमित्त " ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे.

******

 

सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी 30 डिसेंबर रोजी

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 26 :  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांच्यामार्फत दि. 30 डिसेंबर, 2022 रोजी हिंगोली जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.  

या रोजगार मेळाव्यात टाईम्स प्रो औरंगाबाद, गुड वर्कर टेक्नॉलॉजी औरंगाबाद येथील नामांकित कंपनी सहभागी होणार आहेत. हिंगोली जिल्ह्यातील  दहावी, बारावी, डिप्लोमा, पदवी या शैक्षणिक आर्हतेनुसार 100 पेक्षा अधिक रिक्तपदे https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अधिसूचित केलेली आहेत.

नोकरी इच्छूक उमेदवारांनी वरील संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत. जेणेकरुन त्यांना रोजगार मेळाव्यात सहभागी होता येईल.

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी वरील संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करुन स्वत: मूळ कागदपत्रासह जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, एस-3, दुसरा माळा, हिंगोली येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे. याबाबत काही अडचण आल्यास 02456-224574 किंवा 9881150352 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त राजपाल कोल्हे यांनी केले आहे.

*****