20 December, 2022

 

खो-खो शालेय स्पर्धेत वसमतचे संघ पाच गटात विजयी ; एका गटात हिंगोलीचा विजय

 



 

हिंगोली (जिमाका), दि. 20 : येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने व तालुका खो-खो असोसिएशनच्या पुढाकाराने आयोजित जिल्हास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत एकूण पाच गटात वसमत तालुक्याने बाजी मारली आहे. तर एका गटामध्ये हिंगोली तालुक्यातील संघ विजयी झाला आहे. या स्पर्धेमध्ये मुला-मुलींचे एकूण तीस संघ सहभागी झाले होते. 

येथील रामलिला मैदानावर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद हिंगोली व तालुका खो-खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवशीय जिल्हास्तरीय शालेय खो-खो स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध गटातील एकूण तीन संघ सहभागी झाले होते.

चौदा वर्षे मुले वसमतच्या बर्हिजी स्मारक विद्यालयाने विजेते पद पटकाविले आहे. उपविजेते पद सर्वोदय विद्यालय खुडज ता.सेनगाव या संघाला मिळाले आहे. याच गटातील मुलींच्या संघामध्ये जिल्हा परिषद शाळा पांगरी ता.हिंगोली या संघाचा वसमत तालुक्यातील गोरखनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चौंढी आंबा याने पराभूत करुन विजेते पद मिळविले आहे.

17 वर्षे मुले गटात वसमत तालुक्यातील बर्हिजी माध्यमिक विद्यालयाने विजेते पद मिळविले आहे. तर सेनगाव तालुक्यातील संत नामदेव विद्यालय वाघजाळी या शाळेच्या संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले आहे. याच गटातील मुलींमध्ये वसमत तालुक्यातील गोरखनाथ विद्यालय चौंढी आंबा या संघाने विजेते पटकाविले आहे. दुसऱ्या स्थानावर संत नामदेव विद्यालय, सेनगावचा संघ राहिला आहे.

19 वर्षे मुलांच्या गटात वसमतच्या बर्हिजी महाविद्यालयाचा संघ विजेता ठरला आहे. तर द्वितीय स्थानी तोष्णीवाल महाविद्यालय सेनगावचा संघ राहिला आहे. याच गटातील मुलींमध्ये हिंगोली येथील सरजुदेवी भिकुलाल भारुका आर्य विद्यालयाचा संघ विजेता ठरला आहे. द्वितीय स्थानी आखाडा बाळापुर जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचा संघ राहिला आहे. विजेत्या संघाच्या प्रशिक्षक व खेळांडुचा सत्कार करण्यात आला.

स्पर्धा यशस्वीतेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, तालुका खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष कल्याण देशमुख, सचिव प्रा.नरेंद्र रायलवार, संजय भुमरे, अनिल कदम, चिरंजीव कट्टा, सुखबिरसिंग अलग, सुधाकर वाढवे, प्रभाकर काळबांडे, गुरुप्रसाद मुटकुळे, सुनिल सुकणे, रामप्रसाद व्यवहारे, राजेंद्र सोनटक्के, सुधाकर पाईकराव, मनोज टेकाळे, विश्‍वास वायचाळ, मंगेश वायचाळ, शिवाजी इंगोले यांच्यासह खो-खो असोसिएशनचे पदाधिकारी व क्रीडा शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.   

 

*******

No comments: