29 December, 2022

 

युरिया खताची एमआरपीपेक्षा जादा दराने विक्री होत असल्यास

कृषि विभागांशी संपर्क साधण्याचे आवाहन

 

·         रब्बी हंगामासाठी जिल्ह्यात युरिया खताचा 12 हजार 260 मेट्रिक टन इतका आवंटन मंजूर, आज अखेर  1828 मेट्रिक टन खताचा पुरवठा

·         गहु व इतर रब्बी पिकांसाठी शेतकऱ्यांनी प्राधान्याने नॅनो युरियाचा वापर करावा

 

हिंगोली (जिमाका), दि. 29 :  जिल्हयात सद्य परिस्थितीत रब्बी पिकांची मुख्यतः गहु, हरभरा तसेच इतर पिके यांची पेरणी पूर्ण झालेली असून सर्व रब्बी पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. सध्या शेतकरी रब्बी पिकांना खताची मात्रा देत आहेत. कृषि विभागाकडून रब्बी हंगाम-2022 साठी युरिया खताची 12 हजार 260 मेट्रिक टन इतके आवंटन मंजूर झाले आहे.  मंजूर आवंटनानुसार दि. 01 ऑक्टोबर, 2022 पासून आज अखेर 1828 मेट्रिक टन इतका युरिया खताचा जिल्ह्यात पुरवठा झालेला आहे. सद्य परिस्थितीत शेतकन्यांकडुन मोठया प्रमाणावर युरिया खताची मागणी होत आहे.

जिल्हयात काही प्रमाणात युरिया खताचा साठा आहे. कृषि विद्यापिठाच्या शिफारसीनुसार हरभरा पिक हे नत्र स्थिरीकरण करणारे द्विदल पिक असून हरभरा पिकास शेतकऱ्यांनी युरियातून नत्र खताचा दुसरा हप्ता देण्याची आवश्यकता नाही. काही शेतकरी युरीया खत देत असल्याचे निदर्शनास आले आहे. हरभरा पिकास युरिया खत दिल्यामुळे पिकाची फक्त कायीक वाढ जास्त होऊन त्याची रोगप्रतिकारक क्षमता कमी होऊन उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असते. तसेच शेतकऱ्याचा उत्पादन खर्च वाढून शेतकऱ्याचा फायदा होण्याऐवजी नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हरभरा पिकास युरीया खताचा वापर दुसऱ्या हप्त्याच्या स्वरुपात करु नये. तसेच गहु व इतर रब्बी पिकांसाठी शेतकऱ्यांनी प्राधान्याने नॅनो युरियाचा वापर करावा. नॅनो युरिया जिल्ह्यात मुबलक प्रमाणावर उपलब्ध आहे. तसेच येत्या काही दिवसात युरिया खताचा पुरवठा जिल्हयात होणार आहे. तसेच शेतकऱ्यांनी युरिया खताची एमआरपी पेक्षा जादा दराने खरेदी करु नये. जिल्ह्यात कोठेही युरिया खताचे एमआरपी पेक्षा जादा दराने विक्री होत असेल तर तात्काळ कृषि विभागाशी संपर्क साधण्यात यावा, असे आवाहन शिवराज घोरपडे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, हिंगोली यांनी  केले आहे.

******

 

No comments: