29 December, 2022

 

जिल्हा कृषि प्रदर्शन व राज्यस्तरीय हळद महोत्सवाचा

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडून आढावा

 



            हिंगोली (जिमाका), दि. 29 :  जिल्हा कृषि प्रदर्शन व राज्यस्तरीय हळद महोत्सवाचे दि. 13 जानेवारी ते 16 जानेवारी, 2023 या कालावधीत आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दि. 13 जानेवारी, 2023 रोजी  होणार आहे. यावेळी पालकमंत्री व इतर मंत्रीमहोदयांची उपस्थिती राहणार आहे. हे महोत्सव यशस्वी करण्यासाठी वेगवेगळ्या 15 समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या सर्व समितीने केलेल्या कामकाजाचा व नियोजनाचा आढावा आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी घेतला.

            जिल्हा कृषी प्रदर्शन व राज्यस्तरीय हळद महोत्सवाच्या आयोजनाच्या पूर्वतयारीबाबत विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आली. यावेळी अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे, आत्माचे प्रकल्प संचालक युवराज शहारे, हळद संशोधन व प्रक्रिया केंद्राचे व्यवस्थापकीय संचालक रविशंकर चलवदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एल. बोंद्रे, कृषि विकास अधिकारी निलेश कानवडे, सर्व तालुका कृषि अधिकारी यांच्यासह तसेच सर्व समितीचे अध्यक्ष, सदस्य, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. 

            यावेळी  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्हा कृषि प्रदर्शन व राज्यस्तरीय हळद महोत्सवात प्रदर्शन स्टॉल लावणे, वाहन व्यवस्था, पार्कींग, प्रदर्शनाच्या ठिकाणी वीज, पाणी, फिरते शौचालय यासह आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना दिल्या. तसेच या महोत्सवानिमित्त चार दिवस राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रम, चर्चासत्र, उपक्रमाची माहिती घेऊन आपणास सोपविण्यात आलेली जबाबदारी वेळेत व यशस्वीपणे पार पाडावी, अशा सूचनाही श्री. पापळकर यांनी  दिल्या. 

****

No comments: