27 December, 2022

 

बाल विवाह प्रतिबंधक अधिसूचनेचे काटेकोरपणे पालन करावेत

                                                        - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश

 


हिंगोली (जिमाका), दि. 27 :  जिल्ह्यात बाल विवाह समूळ नष्ट करण्यासाठी बाल विवाह प्रतिबंध अधिनियम 2006 च्या कलम 19 द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन आणि महाराष्ट्र बाल विवाह प्रतिबंध नियम, 2008 चे अधिक्रमण करुन शासनाने काही नवीन नियम करण्यात आले आहेत. त्यानुसार प्रत्येक शाळेत जर विद्यार्थी 15 दिवसापेक्षा जास्त दिवस गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांची रजिस्टरला नोंद ठेवावी. राष्ट्रगीत झाल्यानंतर बाल विवाह प्रतिज्ञेचे वाचन करावे, तसेच प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात बाल विवाह प्रतिज्ञेचे फलक लावावेत व बाल विवाह प्रतिबंध अधिसुचनेनुसार सर्व नियमांचे जिल्ह्यात काटेकोरपणे पालन करावेत, असे निर्देश सर्व संबंधित यंत्रणांना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा बाल संरक्षण कक्षाची कामकाज आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी श्री.पापळकर बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, जिल्हा कार्यक्रम अधिकारी गणेश वाघ, शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी यांची उपस्थिती होती.

            या बैठकीमध्ये कक्षाने जिल्ह्यातील विविध ठिकाणी घेण्यात आलेल्या दत्तक नियमावली 2022 ची प्रचार व प्रसिध्दीची तसेच अनाथ पंधरवाडा व बालकांविषयीच्या कायद्याची जाणीव जागृती कार्यक्रम, बाल विवाह निर्मूलनासाठी मशाल फेरी, कॅन्डल मार्च, भारुडाच्या माध्यमातून व शाळेतील विद्यार्थ्यांना बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा देवून जनजागृती कार्यक्रमाची माहिती सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांनी दिली. तसेच मिरॅकल फाऊंडेशन मार्फत निरीक्षणगृह, बालगृहातील बालकांसाठी लाईफ बूक विषयी सत्र घेण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.  

या बैठकीस पोलीस अधिक्षक यांचे प्रतिनिधी, जिल्हा कामगार अधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, बाल न्याय मंडळ संदस्य, बाल कल्याण समिती अध्यक्ष / सदस्य, चाईल्ड लाईन टीम मेंबर, तसेच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) गणेश मोरे,  कायदा व परिविक्षा अधिकारी अॅड. अनुराधा पंडित, बाल संरक्षण अधिकारी (संस्था बाह्य) जरीबखान पठाण, सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे, समुपदेशक रेशमा पठाण, सचिन पठाडे, क्षेत्र कार्यकर्ता अनिरुध्द घनसावंत आदी उपस्थित होते.

 

******

No comments: