कबड्डी स्पर्धेत हिंगोलीचा एक
संघ विजेता तर दुसरा संघ उपविजेता
विभागीय शालेय कबड्डी स्पर्धेचा
समारोप ; 21 संघाचा सहभाग
हिंगोली (जिमाका), दि. 27 : शालेय गटातील विभागस्तरीय कबड्डी स्पर्धेत मुलांमध्ये सतरा
वर्षे वयोगटात हिंगोलीच्या संघाने बाजी मारली. तर चौदा वर्षे वयोगटात हिंगोलीचा संघ
उपविजेता ठरला. अत्यंत चुरशीच्या लढतीत हिंगोलीने चमकदार खेळी केली. शालेय गटात विभागातील
21 संघाने सहभाग घेतला होता. स्पर्धेचा समारोप मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
हिंगोली येथील रामलीला
मैदानावर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त
विद्यमाने आयोजित शालेय गटातील विभागस्तरीय दोन दिवशीय कबड्डी स्पर्धेचा समारोप सोमवार
दि. 26 डिसेंबर रोजी संपन्न झाला. मुलांच्या
गटातील स्पर्धेत अत्यंत चुरशीच्या लढती पहावयास मिळाल्या. तीन मैदानावर तीन गटात स्पर्धा
घेण्यात आल्या. या स्पर्धेत चौदा वर्षीय मुले विद्यानिकेतन हायस्कुल गंगाखेड, जि.परभणी
या संघाने हिंगोली जिल्ह्यातील जि.प.प्रशाला सवना ता.सेनगाव या संघाचा पराभव केला.
हिंगोलीला चौदा वर्षे वयोगटात उपविजेते पद मिळाले आहे. सतरा वर्षे वयोगटात हिंगोली
जिल्ह्यातील रेणुका माता विद्यालय, चिंचोली ता.औंढा नागनाथ या संघाने प्रतिस्पर्धी
संघ बीड जिल्ह्यातील निवृत्तीराव धस विद्यालय जांमगाव ता.आष्टी या संघाचा अत्यंत चुरशीच्या
लढतीत पराभव केला. हिंगोली जिल्ह्याला सतरा वर्षे वयोगटात विजेते पद मिळाले आहे. एकोणवीस
वर्षे वयोगटात बीड जिल्ह्यातील निवृत्तीराव धस विद्यालय, जांमगाव ता.आष्टी या संघाने
जालना जिल्ह्यातील जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वाडी बु. , ता.भोकरदन
या संघाचा पराभव केला. विजेत्या
व उपविजेत्या तीनही गटातील संघातील खेळांडु व प्रशिक्षकांचा सत्कार निवृत्त शिक्षण
अधिकारी शिवाजी पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, जिल्हा कबड्डी असोसिएशनचे
सचिव प्रा.नवनाथ लोखंडे, आयोजन समितीचे प्रमुख तथा कबड्डी असोसिएशनचे कोषाध्यक्ष मेजर
प्रा.पंढरीनाथ घुगे, संयोजन समितीचे समन्वयक कल्याण देशमुख, क्रीडा अधिकारी बसी, संजय
बेत्तीवार यांनी केला.
स्पर्धा यशस्वीतेसाठी
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा कबड्डी असोसिएशन, तालुका खो-खो असोसिएशन यांचे
पदाधिकारी, पंच समिती, आयोजन समितीने परिश्रम घेतले. हिंगोली जिल्ह्यातील विजेत्या
संघाचे प्रशिक्षक माधव चव्हाण, कल्याण पोले यांच्यासह खेळांडुचे अभिनंदन करण्यात आले.
दोन दिवशीय स्पर्धेला क्रीडा प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद होता.
****
No comments:
Post a Comment