चला जाणूया नदीला’ अभियानाचा मुख्य
सचिवांनी घेतला आढावा
हिंगोली (जिमाका), दि. 09 : राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार
श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली ‘चला जाणुया नदीला’ या अभियानाची दूरदृश्य प्रणालीद्वारे दि.
08 डिसेंबर रोजी आढावा बैठक पार पडली. यामध्ये मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव
यांनी हे अभियान कशा पध्दतीने राबविले गेले पाहिजे, यामध्ये कोणाकोणाचा सहभाग
आवश्यक आहे. कोणकोणत्या पध्दतीने हे अभियान यशस्वी होईल याबाबत विस्तृत मार्गदर्शन
केले. तसेच या बैठकीमध्ये देण्यात
आलेल्या सूचनाबाबत काय कार्यवाही केली गेली आहे याचा आढावा पुढील बैठकीत घेतला
जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये जलतज्ञ डॉ.
राजेंद्र सिंग हे देखील सहभागी झाले होते. यावेळी मार्गदर्शन करतांना ते म्हणाले
की, राज्य शासनाचे हे अभियान खूपच महत्त्वाचे असून हे यशस्वी होणे गरजेचे आहे. या
अभियानामध्ये 108 नद्यांचा समावेश करण्यात आला आहे. हे अभियान राबविताना प्रथम नदी
प्रदूषण कोणत्या कारणांमुळे होत आहे ते शोधून काढणे महत्त्वाचे आहे. नदी
प्रदूषणाची कारणे मिळाल्यानंतर त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात.
याचबरोबर या अभियानाबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे. या अभियानात सामाजिक
कार्यकर्ते व सामान्य
नागरिक देखील सहभागी झाले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या व्हिडीओ कॉन्फरन्सनंतर जिल्हाधिकारी
जितेंद्र पापळकर म्हणाले, या अभियानांतर्गत आपल्या जिल्ह्यात कयाधू आणि आसना नदीला पुनरर्जिवित करण्याच्या दृष्टीने जिल्हा
पातळीवर तांत्रिक समितीसह इतर दोन समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. प्रदूषण व वन विभाग यांचा सक्रीय
सहभाग या अभियानामध्ये आवश्यक आहे. तसेच जिल्ह्यातील
नगरपालिका यांच्यामार्फत शहरातील, गावातील सर्व सांडपाणी ओढ्यामध्ये सोडले जाते. तेच
पाणी नदीमध्ये जाते. हे टाळण्यासाठी सर्व विभागांचा देखील या अभियानामध्ये सहभाग घ्यावा
लागेल. याबाबत समाज माध्यमाद्वारे जनतेमध्ये जनजागृती करावी. तसेच या अभियानाचा कृती
आराखडा तयार करावा, असे सांगून या अभियानाची सुरुवात लवकरच करण्यात येणार असल्याची
माहिती जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी यावेळी
सांगितले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी, जयाजी पाईकराव यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित
होते.
****
No comments:
Post a Comment