18 December, 2022
अल्पसंख्यांक हक्क दिन उत्साहात साजरा
हिंगोली (जिमाका), दि. 18 संयुक्त राष्ट्र संघटनेने 18 डिसेंबर, 1992 रोजी राष्ट्रीय, वांशिक, धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्यांकांच्या हक्काचा जाहीरनामा स्वीकृत करुन प्रस्तूत केला होता. त्याकरिता दरवर्षी 18 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय अल्पसंख्यांक दिवस म्हणून साजरा केला जातो. तसेच अल्पसंख्यांक समाजास त्यांच्या घटनात्मक आणि कायदेशीर हक्काची जाणीव व माहिती व्हावी याकरिता अल्पसंख्यांक विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांनी देखील 18 डिसेंबर हा दिवस अल्पसंख्यांक हक्क दिवस म्हणून आयोजित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याअनुषंगाने आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात अल्पसंख्यांक हक्क दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी जिंतेंद्र पापळकर, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, माजी प्राचार्य विक्रम जावळे,श्रीमती वंदना सोवितकर,फादर जितीस देवीस,अझहर पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अल्पसंख्यांकासाठी राबविण्यात येणाऱ्या अल्पसंख्यांक मुलींचे वसतीगृह, डॉक्टर झाकीर हुसैन मदरसा अत्याधुनिकीकरण योजना, अल्पसंख्यांक शासनमान्य खाजगी शाळांना पायाभूत सुविधा, मौलाना अब्दुल कलाम आजाद आर्थिक विकास महामंडळ आदी विविध योजनांची माहिती देऊन अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.यावेळी अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्त जिल्हास्तरावर घेण्यात आलेल्या निबंध, वकृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण तसेच अल्पसंख्याक मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीचे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अल्पसंख्याक जिल्हा समन्वयक सय्यद माबुद सय्यद आमीन, तालुका समन्वयक कुलदीप नाभिराज मास्ट यांचा सत्कार जिल्हाधिकारी जिंतेंद्र पापळकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव यांनी प्रास्ताविकात जिल्ह्यात अल्पसंख्यांक विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. यावेळी जिल्हा नियोजन कार्यालयातील राहूल बहादुरे, शेख आरिफ, गजानन गुंडेवाड, जिल्ह्यातील शालेय विद्यार्थी-विद्यार्थींनी, शिक्षक मार्गदर्शक आणि अल्पसंख्यांक समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment