आजपासुन विभागीय कबड्डी स्पर्धेला सुरुवात होणार...!
विभागातील ४२ संघ हिंगोलीत दाखल; रामलिला मैदानावर जय्यत तयारी
हिंगोली (जिमाका), दि. २४ : शालेय गटातील विभागीय कबड्डी स्पर्धेचे यजमान पद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोलीला मिळाले असून रविवार पासून विभागीय क्रीडा स्पर्धेला सुरुवात होणार आहे. विभागातील ४२ संघ हिंगोलीत दाखल होणार असून रामलिला मैदानावर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जय्यत तयारी करण्यात येत आहे.
हिंगोली शहरातील रामलिला मैदानावर रविवार दि.२५ व २६ डिसेंबर रोजी दोन दिवशीय शालेय गटातील विभागस्तरीय कबड्डी स्पर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा कबड्डी असोसिएशन हिंगोलीच्या वतीने आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेमध्ये विभागातील मुलींचे २१ तर मुलांचे २१ असे एकूण ४२ संघ रविवारी सकाळी दाखल होणार आहेत. कबड्डी स्पर्धेची जय्यत तयारी रामलिला मैदानावर करण्यात येत असून जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कोषाध्यक्ष व आयोजन समितीचे प्रमुख प्रा.मेजर पंढरीनाथ घुगे यांच्या हस्ते मैदानाचे पूजन करुन नारळ फोडण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, संयोजन समिती समन्वयक कल्याण देशमुख, क्रीडा अधिकारी संजय बेत्तीवार, दत्तराव बांगर, प्रा.नरेंद्र रायलवार, विशाल शिंदे, सत्यप्रकाश नांदापुरकर, सुधाकर वाढवे, प्रभाकर काळबांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
रामलिला मैदानावर कबड्डीसाठी तीन मैदानात तीन वेगवेगळया गटात सामने होणार आहेत. एक मैदान राखीव ठेवण्यात आले आहे. रविवार दि.२५ डिसेंबर रोजी शालेय गटातील मुलींचे तर सोमवार दि.२६ डिसेंबर शालेय गटातील मुलांचे सामने होणार असून उद्घाटनासाठी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. भव्य पेंडाल उभारणी, मैदान स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, खेळांडुच्या चेंजिंग रुमसाठी माजी खा.स्व.शिवाजीराव देशमुख सभागृह पालिकेने उपलब्ध करुन दिलेले आहे. फिरत्या स्वच्छतागृहाची व्यवस्थाही मैदान परिसरात करण्यात येणार आहे. सामने सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत खेळविण्यात येणार आहेत. स्पर्धा यशस्वीतेकरिता जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कोषाध्यक्ष तथा प्रमुख आयोजन प्रा.मेजर पंढरीनाथ घुगे, संयोजन समिती समन्वयक कल्याण देशमुख आदी परिश्रम घेत आहेत. ****
No comments:
Post a Comment