07 December, 2022

 

ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावेत

                                                         -- अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी

 


हिंगोली (जिमाका), दि. 07 : सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनासाठी हिरिरीने सहभाग घेतलेल्या अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा देताना पुढील वर्षाचे उद्दिष्ट कालावधीची वाट न पाहता वेळेत पूर्ण करावेत, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केले.

            येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील डी.पी.सी सभागृहात आज सशस्त्र सेना ध्वजदिन 2022 निधी संकलन शुभारंभाच्या कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी श्री. परदेशी बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, मुख्याधिकारी अरविंद मुडे यांची उपस्थिती होती.

            यावेळी बोलताना अपर जिल्हाधिकारी श्री. परदेशी म्हणाले की, संरक्षण दलाचे जवान व अधिकारी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अहोरात्र देशाच्या सीमांचे रक्षण करतात. त्यामुळेच आपण सुखी जीवन जगत असतो, या सर्व सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या निधीतून माजी सैनिक, शहीद जवान अधिकारी यांचे कुटुंबियासाठी विविध योजनांच्या माध्यमातून मदत करण्यात येते. त्यामुळे पुढील वर्षाचे उद्दिष्ट कालावधीची वाट न पाहता वेळेत उद्दिष्ट पूर्ण करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

देशाच्या रक्षणाची भूमिका बजावत असताना आपले जवान सैनिक आपल्या कुटुंबियांची पर्वा न करता ते सतत देशसेवा करत असतात. अशा लष्करी अधिकारी जवानांची आणि त्यांच्या कुटूंबियाची काळजी घेणे ही आपणां सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनासाठी हिरिरीने सहभाग घेतलेल्या अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच मातृभूमीसाठी देशाच्या सैनिकांकडून असेच चांगले कार्य घडो, यासाठी शुभेच्छा दिल्या व माजी सैनिकांना आलेल्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे, असेही अपर जिल्हाधिकारी श्री. परदेशी यांनी सांगितले.

            निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन कार्यक्रम आयोजित करण्यामागची भूमिका विशद केली . तसेच सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनामधून माजी सैनिकांसाठी राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

            कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमेस पुष्प अर्पण  करण्यात आले व देशासाठी बलिदान दिलेल्या सैनिकाप्रती दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. तसेच यावेळी  मातोश्री गंगादेवी देवडा निवासी आंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या चमूने स्वागत गीत सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. यावेळी मान्यवंराच्या हस्ते श्रीमती सरस्वती बैरागी यांनी त्यांच्या पतीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 11 हजार रुपये ध्वजदिन निधीस अर्पण केल्याबद्दल तसेच ध्वजदिन निधी संकलनाचे उत्कृष्‍ट कार्य केलेल्या कार्यालय प्रमुखांचा प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला. शहीद सैनिक रणवीर गणपत भिकाजी यांच्या माता-पित्याचा साडीचोळी देवून सत्कार केला. तसेच माजी सैनिकांच्या पाल्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रकाश इंगेाले यांनी केले. तर आभार प्रदर्शन सुरेश भालेराव यांनी केले.

            या कार्यक्रमास माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सय्यद मीर तसेच , वीर माता-पिता, माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेश भालेराव, उत्तमराव लेकुळे आदींनी सहकार्य केले.

   

*******

No comments: