22 December, 2022

 


जिल्हा कृषि प्रदर्शन व राज्यस्तरीय हळद महोत्सवाचे

13 ते 16 जानेवारी या कालावधीत आयोजन

·         पूर्वतयारीबाबत निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यानी घेतला आढावा

 

            हिंगोली (जिमाका), दि. 22 :  जिल्हा कृषि प्रदर्शन व राज्यस्तरीय हळद महोत्सवाचे दि. 13 जानेवारी ते 16 जानेवारी, 2023 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत. या महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत दि. 13 जानेवारी, 2023 रोजी होणार आहे. या महोत्सवात घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमाच्या अनुषंगाने  केलेल्या कामाचा आढावा निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी घेतला.

            जिल्हा कृषी प्रदर्शन व राज्यस्तरीय हळद महोत्सवाच्या आयोजनाच्या पूर्वतयारीबाबत विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक दि. 21 डिसेंबर रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे, आत्माचे प्रकल्प संचालक युवराज शहारे, हळद संशोधन व प्रक्रिया केंद्राचे व्यवस्थापकीय संचालक रविशंकर चलवदे, कृषि उपसंचालक एस.व्ही.लाडके, कृषि विकास अधिकारी निलेश कानवडे, सर्व तालुका कृषि अधिकारी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.  

            यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी जिल्हा कृषि प्रदर्शन व राज्यस्तरीय हळद महोत्सवात चार दिवस घेण्यात येणाऱ्या कार्यक्रम, चर्चासत्राची माहिती घेतली. तसेच प्रदर्शनामध्ये स्टॉल लावणे, यासाठी प्रत्येक विभागानी कामाचे नियोजन करुन कामकाज करावेत. तसेच प्रदर्शनाच्या ठिकाणी वीज, पाणी, फिरते शौचालय, वाहन पार्कींग यासह आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावेत, अशा सूचना सर्व संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.

            याप्रसंगी मयूर मंत्री यांनी चार दिवस राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमाची माहिती दिली. याबाबत सर्व समिती सदस्यांनी समन्वयाने कार्यक्रमाची रुपरेषा निश्चित करावी, असे सांगितले. 

            यावेळी आत्माचे प्रकल्प संचालक युवराज शहारे यांनी नियोजित कृषि प्रदर्शन व राज्यस्तरीय हळद महोत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी समित्या गठीत करण्यात आल्या असून समितीमध्ये जे कर्तव्य जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. त्या यशस्वीपणे पार पाडावेत, असे सांगून कार्यक्रमाची आयोजनाची माहिती दिली.

            यावेळी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी प्रत्यक्ष व ऑनलाईन बैठकीस उपस्थित होते .

****

No comments: