गोवरच्या लसीपासून एकही
बालक वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी
-- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
हिंगोली (जिमाका), दि. 09 : राज्यात सध्या गोवरचा उद्रेक आढळून येत आहे. त्यामुळे हिंगोली
जिल्ह्यात गोवर-रुबेला उद्रेक होऊ नये यासाठी
जिल्ह्यातील सर्व बालकांना लसीकरण करावे आणि गोवरच्या लसीपासून एकही बालक
वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
यांनी दिले.
येथील जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या सभागृहात आज नियमित लसीकरण कार्यक्रम अंतर्गत गोवर-रुबेला टास्क
फोर्स समितीची बैठक जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित
करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी संजय दैने, महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश
वाघ, शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके, अतिरिक्त
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.मंगेश
टेहरे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर देवेंद्र जायभाये, डॉ, सतीश रुणवाल, डॉ.नामदेव कोरडे, डॉ.संदीप काळे डॉ.सावंत
यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले, गोवरच्या
पहिल्या व दुसऱ्या डोसची माहिती घेऊन याद्या तयार कराव्यात. गोवर आणि रुबेला
लसीपासून वंचित असलेल्या बालकांना विशेष लसीकरण मोहिम राबवून त्यांचे लसीकरण करुन
घ्यावेत. तसेच संशयित बालक आढळून आल्यास त्याच्यावर नियमित उपचार सुरु ठेऊन
त्यांचा संसर्ग इतर बालकांना होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना केल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी जिल्ह्यात विशेष
मोहिम राबवून प्रत्येक घरांना भेटी देवून बालकांची माहिती घ्यावी. लसीकरणापासून
वंचित असलेल्या बालकांना या विशेष मोहिमेत लसीकरण करावेत. तसेच जिल्ह्यातील एकही
बालकाला धोका होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच याबाबत ग्रामपातळीवर व शहरात
तालुका आरोग्य अधिकारी यांच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे काम करावे, अशा सूचना
केल्या.
यावेळी डॉ.सचिन भायेकर यांनी
गोवर रुबेला विशेष लसीकरण मोहीमेबाबत सविस्तर माहिती दिली. गोवर रुबेला विशेष लसीकरण
मोहिम पहिली फेरी दि. 15 डिसेंबर ते 25 डिसेंबर,2022 या कालावधी मध्ये राबविण्यात
येत आहे. दुसरी फेरी दि. 15 जानेवारी ते 25 जानेवारी, 2023 या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे. यामध्ये
9 ते 12 महिन्यांच्या बालकांना गोवर रुबेलाचा पहिला डोस आणि 16 ते 24 महिन्यांच्या
बालकांना गोवर रुबेलाचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. गोवर रुबेला लसीचा चुकलेला डोस
या विशेष लसीकरण मोहिमेमध्ये देण्यात येणार आहे. गोवर रुबेलाचा डोस नजीकच्या लसीकरण सत्रात मोफत उपलब्ध आहे. हा डोस उपजिल्हा
रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र या
ठिकाणी मोफत देण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पालकांनी आपल्या मुलाला गोवर
रुबेलाचा डोस आवश्यक द्यावा आणि गोवर, रुबेलाला हरवूया हे लसीकरण नक्की करुया !
असे आवाहन केले.
यावेळी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच मनीष वडकुते, आरोग्य सहाय्यक डी. आर. पारडकर, शेख
मुनाफ आदी उपस्थित होते.
****
No comments:
Post a Comment