25 December, 2022

 विभागीय कबड्डी स्पर्धेत विभागातील मुलींचे वीस संघ सहभागी ; स्पर्धेचे उद्घाटन थाटात



हिंगोली (जिमाका), दि. २५ : शालेय गटातील विभागीय कबड्डी स्पर्धेत विभागातील मुलींचे वीस संघ सहभागी झाले असून पहिल्या दिवशी मुलींच्या गटातील सामने खेळविण्यात आले. स्पर्धा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न झाला. मंगळवारी शालेय कबड्डी मुलांचे सामने होणार आहेत.

हिंगोली शहरातील रामलिला मैदानावर रविवार दि.२५ व २६ डिसेंबर रोजी दोन दिवशीय शालेय गटातील विभागस्तरीय कबड्डी स्पर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा कबड्डी असोसिएशन हिंगोलीच्या वतीने आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये रविवार दि. २५ डिसेंबर रोजी शालेय विभागस्तरीय मुलींच्या कबड्डी स्पर्धेला  सुरुवात झाली. या स्पर्धेचे उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष माजी खासदार अॅड शिवाजी माने यांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, माजी उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, आयोजन समितीचे प्रमुख तथा जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कोषाध्यक्ष मेजर पंढरीनाथ घुगे, जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव प्रा. नवनाथ लोखंडे,  संयोजन समिती समन्वयक कल्याण देशमुख, क्रीडा अधिकारी बस्सी, संजय बेत्तीवार यांची प्रमुख उपस्थिती होती. 

     प्रास्ताविक आयोजन समिती प्रमुख मेजर पंढरीनाथ घुगे यांनी केले. अध्यक्षीय समारोप माजी खासदार अॅड शिवाजी माने यांनी केला. यावेळी अॅड. शिवाजी माने यांनी दिवसेदिवस हिंगोली जिल्ह्यातील क्रीडा स्पर्धा सातत्यपूर्ण आयोजन होत आहेत. विविध स्पर्धेतून खेळाडू पुढे येत असून गावपातळीवर मैदाने सातत्यपूर्ण राहावेत, यासाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन केले.  आभार प्रदर्शन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले. 

विभागीय स्तरावरील शालेय मुलींच्या गटात एकूण वीस संघ सहभागी झाले असून यामध्ये परभणी ग्रामीण, परभणी मनपा,  बीड, जालना, औरंगाबाद ग्रामीण, औरंगाबाद मनपा, हिंगोली असे एकूण सात जिल्ह्यातील प्रत्येकी तीन संघ असे एकूण २० संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला असून कबड्डी सामने चुरशीचे होत आहेत. यावेळी क्रीडा प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.                                    

*****

No comments: