11 December, 2023

 

राज्य व केंद्र सरकारची धोरणे आणि उपक्रमाबाबत

जागरुकता वाढविण्यासाठी 14 डिसेंबर रोजी एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन

 

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 11 : गुंतवणुक वृध्दी, व्यवसाय सुलभीकरण, निर्यात, एक जिल्हा एक उत्पादन व एमएसएमई क्षेत्राबाबत उद्योजकांना  माहिती व्हावी तसेच राज्य व केंद्रशासनाची धोरणे व उपक्रमाबाबत जागरुकता वाढविण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र, हिंगोली मार्फत दिनांक 14 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी 09:30 वाजता एक दिवशीय कार्यशाळा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे आयोजित करण्यात आलेली आहे.

या कार्यशाळेचा उद्देश हा हिंगोली जिल्ह्यातील उद्योजकांचे उत्पादन, जागतिक बाजारात नेणे हा आहे. तसेच स्थानिक उत्पादनाची गुणवत्ता वाढविणे, निर्यात प्रक्रिया, खरेदीदार आणि विक्रेते शोधणे, निर्यात कर्ज आणि अनुदान योजना, पॅकींग व ब्रँडींग, आवश्यक चाचण्या आदी विषयावर या कार्यशाळेत चर्चा होणार आहे. या कार्यशाळेचे सीडबी, आयडीबीआय कॅपिटल हे मुख्य प्रयोजक आहेत. उद्योग संचालनालय, मुंबई अंतर्गत जिल्हा उद्योग केंद्र, हिंगोली व इतर विभागाचे संबंधित अधिकारी कार्यशाळेत उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत,

या कार्यशाळेस सर्व औद्योगिक संघटना, नामांकित उद्योजक, सर्व निर्यातदार, फार्मर प्रोड्युसर कंपनी, नवउद्योजक, उद्योग व्यवसायासाठी संबंधित सर्व शासकीय विभाग व संस्था यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एस.ए. कादरी यांनी केले आहे.

******

No comments: