05 December, 2023

 

अवकाळी पावसामुळे तुरीवर पडणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी

एकात्मिक कीड व्यवस्थापन योजनेचा अंगीकार करावा

 

 

            हिंगोली (जिमाका). दि. 05 : जिल्ह्यात यंदा 34 हजार 266 हेक्टर क्षेत्रावर तुरीचा पेरा आहे. तूर पिकावरील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये पिकांसदर्भात वेळोवेळी सर्वेक्षण करुन प्रादुर्भाव ओळखून आवश्यकतेनुसार व्यवस्थापन करण्याचाही कालावधी आहे. तुरीवर शेंगा पोखरणारी अळी (घाटे अळी), पिसारी पतंग व शेंग माशी या तिन्ही किडी कळ्या, फूल व शेंगावर आक्रमण करुन तुरीच्या उत्पादनात लक्षणीय घट आणू शकतात. यासाठी शेतकरी बंधुनी जागरुक राहून या तिन्ही किडीच्या व्यवस्थापनासाठी एकात्मिक व्यवस्थापन योजनेचा अंगीकार करावा.

तुरीच्या फुलगळ व चठ्ठेगळ या समस्येसाठी एन.ए.ए.4 मिली+ 10 मिली बोरॉन प्रती 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेंगा पोखरणी अळी व फायटोप्थेरा मर या समस्येसाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के 4.4 ग्राम + मेटॅलॅक्झील + मॅनकोझेब 25 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून आवश्यकतेनुसार फवारणी करावी, अशी शिफारस वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथील शासत्रज्ञ डॉ. गजानन गडदे यांनी केली आहे.

त्यानुषंगाने नियंत्रणासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत पिकांसाठी सन 2023-24 या योजनेंतर्गत एकात्मिक कीड व्यवस्थापन या बाबीसाठी पिक संरक्षण औषधे, जैविक कीड नियंत्रण या निविष्ठांसाठी शेतकऱ्यांना किंमतीच्या 50 टक्के किंवा कमाल 500 रुपये प्रती हेक्टर याप्रमाणे कमाल 2 हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत लाभ देय आहे.

हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या व इतर कीड व रोग नियंत्रणासाठी वरील निकषानुसार निविष्ठा खरेदी करुन त्याची खरेदी पावती, सातबारा, आधारकार्ड व बँक खात्याचा तपशील इत्यादी कागदपत्रे संबंधित तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी कार्यालयाकडे दि. 30 डिसेंबर, 2023 पूर्वी सादर करावीत. त्यानुसार त्यांना अनुज्ञेय असलेले अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट लाभ हस्तांतरण पध्दतीने वर्ग करण्यात येईल. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन शिवराज घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.    

 

*******

No comments: