05 December, 2023

 

युवकांना तृणधान्याचे महत्व कळण्यासाठी युवा महोत्सव

                                                                --- शिवराज घोरपडे

 

·         ‘युवा महोत्सव’मुळे युवकांच्या कलागुणांचा विकास-डॉ. सुधीर वाघ

·         पौष्टिक आहार व आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी युवकांचा सहभाग महत्वाचा-रामेश्वर मांडगे

 



 

            हिंगोली (जिमाका). दि. 05 : संयुक्त राष्ट्र संघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षे घोषित केले आहे. युवकांना तृणधान्याचे महत्व कळावे, यासाठी युवा महोत्सवात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे यांनी केले.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने येथील शिवाजीराव देशमुख सभागृहात आयोजित जिल्हास्तर युवा महोत्सव 2023-24 च्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. सुधीर वाघ हे होते. यावेळी  जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत, प्रगतीशील शेतकरी रामेश्वर मांडगे, तालुका क्रीडा युवक संघाचे गंगावणे,  क्रीडा अधिकारी बोथीकर यांची यावेळी उपस्थिती होती.

पुढे बोलताना श्री. घोरपडे म्हणाले, पौष्टिक तृणधान्य ज्वारी, नाचणी हे अत्यंत कमी पाण्यामध्ये येणारे पीक आहे. ज्वारीचे क्षेत्र कमी होत चालले आहे. ज्वारीचे क्षेत्र वाढविण्यासाठी युवा महोत्सवाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत, असे सांगून आज जागतिक मृदा दिवस आहे. युवकांनी माती आणि पोष्टिक तृणधान्य याचे महत्व पटवून देण्यासाठी युवा महोत्सवाच्या विविध उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

प्रगतीशील शेतकरी रामेश्वर मांडगे यांनी शेती ही भारताच्या अर्थव्यवस्थेची नाळ आहे. त्यामुळे सेंद्रीय शेतीचाअवलंब करुन विषमुक्त शेती करण्याची गरज आहे. विषमुक्त अन्न खाल्यामुळे आरोग्य चांगले राहणार आहे. अन्नामध्ये ज्वारीला अनन्यसाधारण महत्व आहे. चांगले अन्न आणि शेतीशिवाय जगातली अर्थव्यवस्था चालण्यासाठी विषमुक्त अन्न तयार केले पाहिजेत. त्यामुळे सेंद्रीय पध्दतीने ज्वारीची लागवड करुन विषमुक्त अन्न मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आपले आरोग्य चांगले राहिले तर आपण कोणत्याही स्पर्धेत टिकू शकतो. त्यामुळे पौष्टिक आहार आणि शारीरिक आरोग्यावर युवकांनी लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. यासाठी युवकांचा सहभाग महत्वाचा असल्याचे सांगितले. 

अध्यक्षीय भाषणात डॉ. सुधीर वाघ म्हणाले, युवा पिढी ही देशाची शक्ती आहे. त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी युवा महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. सर्व स्पर्धकांनी मनात कोणताही न्यूनगंड न ठेवता आपले कलागुण याठिकाणी सादर करावेत. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जिद्द आवश्यक आहे. आपले व्यक्तिमत्व घडण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करुन पुढे जाणे आवश्यक आहे. या युवा महोत्सवात राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर हिंगोली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व दिसण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. या उपक्रमामुळे युवा वर्गाच्या कलागुणांचा विकास होण्यास मदत होईल, असे सांगितले.

जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी प्रास्ताविकामध्ये युवा वर्गाच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित युवा महोत्सवात विविध 13 स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, असे सांगून युवा महोत्सवाच्या आयोजनाचा उद्देश, महोत्सवाचे स्वरुप आणि या अंतर्गत आयोजित उपक्रम, स्पर्धांची माहिती दिली.

दीपप्रज्वलन आणि नटरंग यांच्या प्रतिमेचे पूजनाने युवा महोत्वाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. धाराशीव शिराळे यांनी केले. तर आभार क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर यांनी मानले. यावेळी परीक्षक, विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

*******

No comments: