आंबा, काजू, संत्रा ही फळपिके व ज्वारी या पिकांसाठी पिकविमा योजनेत
भाग घेण्यासाठी दोन दिवसाची मुदतवाढ
हिंगोली (जिमाका). दि. 03 : राज्यात विमा योजनेंतर्गत कोकणातील आंबा आणि सर्व
राज्यातील काजू, संत्रा व रब्बी हंगामातील ज्वारी पिकासाठी विमा योजनेत भाग
घेण्याचा अंतिम दि. 30 नोव्हेंबर, 2023 होता. मात्र पिकविमा पोर्टलमध्ये काही
तांत्रिक अडचणी उद्भवल्यामुळे काही इच्छूक शेतकरी या पिकासाठी विमा योजनेत भाग
घेण्यापासून वंचित राहिले.
वंचित शेतकऱ्यांना विमा योजनेत भाग घेता यावा यासाठी कोकणातील
आंबा पीक, सर्व राज्यातील काजू, संत्रा या फळपिकांसाठी व रब्बी हंगामातील ज्वारी
या पिकासाठी विमा योजनेत भाग घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या विनंतीवरुन
केंद्र शासनाने दि. 4 व 5 डिसेंबर, 2023 अशी दोन दिवसाची अतिरिक्त मुदतवाढ मंजूर
केली आहे.
आता विमा योजनेत भाग घेण्यापासून वंचित राहिलेल्या
शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.
कोकण व्यतिरिक्त राज्यातील उर्वरित भागातील आंबा फळ
पिकासाठी विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक 31 डिसेंबर, 2023 असा नियमित आहे.
रब्बी हंगामातील गहू, हरभरा, रब्बी कांदा पिकासाठी विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम
दि. 15 डिसेंबर, 2023 असा आहे. या बदलाची नोंद घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी
योजनेत सहभागी व्हावेत, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.
*****
No comments:
Post a Comment