20 December, 2023

 

लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 विषयी

एकदिवशीय कार्यशाळा संपन्न

 



हिंगोली (जिमाका), दि. 20 : दिवसेंदिवस बालकांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. त्याला आळा बसावा या उद्देशाने शासन स्तरावरुन विविध यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. याच उद्देशाने जिल्हा महिला व बालविकास विभाग, मिरॅकल फाऊंडेशन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे विशेष बाल पोलीस पथकातील अधिकारी आणि त्यांचे सहाय्यक, बाल कल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड हेल्पलाईन 1098 या बालकांसंबंधित काम करणाऱ्या सर्व यंत्रणांसाठी लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 याविषयी  जिल्हा महिला व बालविकास अधिकारी माया सुर्यवंशी यांच्या नियोजनानुसार व पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या सहकार्याने अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सभागृहात एकदिवशीय कार्यशाळा संपन्न झाली.

या प्रशिक्षण कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून मिरॅकल फाऊंडेशनचे राज्य समन्वयक सागर शितोळे,  मुस्कान फाऊंडेशनचे पुणे येथील शुभांगी घरबुडे व ॲड. प्रियंका कदम यांनी उपस्थित सहभागींना मार्गदर्शन केले.  या प्रशिक्षणात जेंव्हा एखाद्या बालकासोबत लैंगिक अत्याचार घडतो अशावेळेस बाल कल्याण समिती, पोलीस यंत्रणा, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, वैद्यकीय अधिकारी, सामाजिक संस्था या सर्वांच्या काय जबाबदाऱ्या आहेत. पोक्सो प्रकरणातील बालकांच्या मनोधेर्य योजनेबाबत , सहाय्यक व्यक्ती संदभा्रत मार्गदर्शन तसेच बालसंदर्भात काम करणाऱ्या सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन काम केले. तर पिडित बालकांना लवकरात लवकर न्याय मिळू शकेल व या सर्व बाबी करत असतांना प्रकरणात येणाऱ्या प्रत्यक्ष अडचणीविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणात 53 प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदवला.

यावेळी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे विशेष बाल पोलीस अधिकारी आणि सहाय्यक, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या सहाय्यक लेखाधिकारी कमल शातलवार, बाल कल्याण समिती अध्यक्ष, सदस्य, बाल न्याय मंडळ सदस्या, जिल्हा बाल संरक्षण कक्षातील अधिकारी, कर्मचारी व चाईल्ड हेल्पलाईन 1098 चे कर्मचारी उपस्थित होते.

या प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी केले. सूत्रसंचालन कायदा तथा परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडित आणि आभार प्रदर्शन बाल कल्याण समिती अध्यक्ष सुधाकर इंगोले यांनी केले.

*******

No comments: