08 December, 2023

 

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज साधणार दूरदृश्य प्रणालीद्वारे नागरिकांशी संवाद

 

* हिंगोली जिल्ह्यातील दहा गावात शनिवारी जाणार संकल्प यात्रा

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 08 : केंद्र शासनाच्या विविध योजना समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहचाव्यात, तसेच त्यांना या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही विशेष मोहीम  24 नोव्हेंबर ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत हिंगोली जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील 563 ग्रामपंचायतींमध्ये चित्ररथाद्वारे शासकीय योजनांची माहिती दिली जात असून लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण, नाव नोंदणी करण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत उद्या शनिवार, दि. 9 डिसेंबर, 2023 रोजी जिल्ह्यातील दहा गावामध्ये ही विकसित भारत संकल्प यात्रा जाणार आहे. या संकल्प यात्रेदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

उद्या शनिवार, दि. 9 डिसेंबर, 2023 रोजी ही विकसित भारत संकल्प यात्रा हिंगोली तालुक्यात सकाळी आडगाव व सायंकाळी राहोली बु. येथे, कळमनुरी तालुक्यात सकाळी येहळेगांव (ग), सायंकाळी वारंगा त. नांदापूर येथे, वसमत तालुक्यात सकाळी पारडी खु. व सांयकाळी कोनासा येथे, औंढा नागनाथ तालुक्यात सकाळी जामगव्हाण व सायंकाळी पिपंळदरी येथे, सेनगाव तालुक्यात सकाळी गोरेगाव व सायंकाळी केंद्रा बु. येथे जाणार आहे.

              या विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशन, आयुष्मान भारत योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, ओडीएफ प्लस मॉडेल ग्रामपंचायत, स्वच्छ भारत मिशन, कृषि विभागाच्या योजना, माय भारत, धरती कहे पुकार के, मेरी कहानी मेरी जुबानी आदी योजनांची माहिती देण्यात येत आहे. तसेच लाभार्थ्यांच्या यशोगाथा दाखविण्यात येत असून या योजनांच्या लाभार्थ्यांचा सन्मान करणे, त्यांना लाभाचे वितरण करणे, वंचित लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येत आहे.

               यासाठी संबंधित गावातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कृषि सहायक, आरोग्य सेवक, पोलीस पाटील, ग्रामस्थ इत्यांदीसह जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे .

*******

No comments: