13 December, 2023

 

जिल्हा तंबाखू नियंत्रण पथकाची हिंगोली शहरात धडक कार्यवाही

19 लोकांकडून 5 हजार 710 रुपयांचा दंड वसूल

 



 

हिंगोली, (जिमाका) दि. 13  :  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या निर्देशानुसार सर्व शासकीय कार्यालये व शाळांचा परिसर तसेच सार्वजनिक ठिकाणे तंबाखू मुक्त करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आज दि. 13 डिसेंबर, 2023 रोजी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या सुचनेनुसार जिल्हा तंबाखू नियंत्रण पथक व जिल्हा पोलिस यांनी जिल्हा रुग्णालय, हिंगोली शहरातील बस स्टँड परिसरातील व नारायण नगर येथील सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाऊन उल्लंघन करणाऱ्या आणि धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती व तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली.

तंबाखू विरोधी कायदा (कोटपा-2003) नुसार सर्व सार्वजनिक परिसरात तंबाखूयुक्त पदार्थ खाणे, थुंकणे, बाळगणे व विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. हिंगोली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पाडळकर आणि पोलीस उप निरीक्षक आगलावे व पोलिस उप निरीक्षक ठेंगे यांच्या सहकार्याने पो. शि. संतोष करे, पो. शि. ज्ञानेश्वर मस्के, मराठवाडा ग्रामीण संस्था, छत्रपती संभाजीनगरचे मंगेश गायकवाड व जिल्हा रुग्णालयातर्फे कुलदीप केळकर, आनंद साळवे व इतर कर्मचारी यांच्या पथकाने परिसरातील ठिक-ठिकाणी उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती व पान टपऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही केली. या कार्यवाहीत एकूण 19 लोकांकडून 5 हजार 710 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.

कोटपा 2003 च्या नुसार कलम 4 - सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान बंदी आहे. कलम 5 - तंबाखूयुक्त पदार्थ जाहिरात बंदी, कलम 6 - 'अ'  18 वर्षा खालील मुलांना तंबाखूयुक्त पदार्थ विकण्यास सक्त मनाई. कलम 6 'ब'  शैक्षणिक संस्थांच्या 100 मी. परिसरात तंबाखूयुक्त पदार्थ विक्री, सेवन बंदी, कलम 7 - कोणत्याही तंबाखूयुक्त पदार्थावर (पाकिटावर) कर्करोगविषयी चेतावणी पाकिटाच्या 85 टक्के भागावर असावी.

*******

No comments: