प्रधानमंत्री किसान
सन्मान निधी योजनेंतर्गत संपृक्तता साध्य करण्यासाठी
गावपातळीवर प्रभावीपणे
मोहिम राबविण्याचे निर्देश
हिंगोली (जिमाका), दि. 27 : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत
संपृक्तता साध्य करण्यासाठी दि. 6 डिसेंबर, 2023 ते 15 जानेवारी, 2024 या कालावधीत
गावपातळीवर मोहिम राबविण्याचे यापूर्वीच निर्देश दिलेले आहेत. जानेवारी, 2024 च्या
शेवटच्या आठवड्यात पीएम किसान योजनेचा प्रस्तावित सोळावा हप्ता वितरीत करण्यापूर्वी
संपृक्तता मोहिमेची कालबध्द पध्दतीने अंमलबजावणी पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
राज्यात लागवडी योग्य
शेती असणारे 152.85 लाख वहिती खातेदार आहेत. त्यापैकी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी
योजनेत 94.77 लाख पात्र लाभार्थी असून 15 व्या हप्त्यामध्ये 84.67 लाख शेतकरी कुटुंबांना
अनुदानाचा लाभ देण्यात आलेला आहे. यामध्ये 1.49 लाख भूमी अभिलेख नोंदी प्रलंबित,
5.03 लाख बँक खाते आधार संलग्न प्रलंबित, 4.57 लाख ईकेवायसी प्रलंबित, 3.88 लाख स्वयंनोंदणीकृत
लाभार्थ्यांना मान्यता प्रलंबित, 51 स्टॉप पेमेंट प्रलंबित लाभार्थी या मुख्य कारणामुळे सुमारे 10 लाख लाभार्थी योजनेच्या लाभापासून
वंचित राहज असल्याने राज्यात संपृक्तता मोहिम प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे.
प्रधानमंत्री किसान
सन्मान निधी योजनेची संपृक्तता साध्य करण्यासाठी दोन टप्प्यात कामकाज करण्यात येणार
आहे. पहिल्या टप्प्यामध्ये दि. 22 डिसेंबर, 2023 पर्यंत जिल्ह्यातील पीएम किसान योजनेतील
बँक खाते आधार संलग्न नसलेले, ईकेवायसी प्रलंबित असलेले, स्वयंनोंदणी लाभार्थींची मान्यता
प्रलंबित असलेले व स्टॉप पेमेंट केलेले लाभार्थी याबाबत प्राधान्याने कार्यवाही पूर्ण
करावी. आधार सिडींगसाठी पोस्ट खाते, सामाईक सुविधा केंद्र व बँक व्यवस्थापन यांचा प्रभावीपणे
उपयोग करावा, तर ईकेवायसीसाठी ग्रामस्तरीय नोडल अधिकारी सामाईक सुविधा केंद्र यांच्यामार्फत
कामकाज पूर्ण करावेत.
दुसऱ्या टप्प्यामध्ये
दि. 7 जानेवारी, 2024 पर्यंत जिल्ह्यात भूमी अभिलेख नोंदी प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची
नोंद पूर्ण करणे व गावातील नवीन पात्र लाभार्थीचा शोध घेऊन त्यांची पीएम किसान योजनेमध्ये
नोंदणी करण्याबाबत कार्यवाही करावयाची आहे.
दि. 7 जानेवारी,
2024 नंतर गाव, तालुका, जिल्ह्यामध्ये कोणतेही पात्र कुटुंब पीएम किसान योजनेत समाविष्ट
करण्याचे राहिले नसल्याचे प्रमाणपत्र कृषि आयुक्तालयास सादर करावेत.
ग्रामस्तरीय नोडल अधिकाऱ्यांनी करावयाची कार्यवाही
: प्रत्येक गावांसाठी ग्रामस्तरीय नोडल अधिकारी नियुक्त करावा. गावाच्या आकारमानानुसार
एक ते पाच गावांसाठी एका ग्रामस्तरीय नोडल अधिकारी यांची नेमणूक करता येईल. ग्रामस्तरीय
नोडल अधिकारी म्हणून ग्रामपातळीवरील अधिकारी (कृषी सहायक, तलाठी, ग्रामसेवक), सामाईक
सुविधा केंद्र, प्रगतीशील शेतकरी, एफपीओ/एफपीसी यांची सोइनुसार नेमणूक करता येईल. ग्रामस्तरीय
नोडल अधिकारी हा पीएम किसान योजनेच्या कामकाजासाठी संबंधित गावासाठीचा एकमेव संपर्क
बिंदू राहील. ग्रामस्तरीय नोडल अधिकारी यांना पीएम किसान संपृक्तता मोहिमेसाठी दि.
15 डिसेंबर, 2023 पर्यंत प्रशिक्षण द्यावे. सोयीच्या दिवशी ग्रामसभा आयोजिजत करुन त्याच
दिवशी शिबीर आयोजन करावे व पोस्ट खाते, सामाईक सुविधा केंद्र यांचा सहभाग घेऊन बँक
खाते आधार संलग्न करावेत व ईकेवायसी पूर्ण करण्याची कार्यवाही करावी.
ग्रामस्तरीय नोडल अधिकारी यांच्या भूमिका व जबाबदाऱ्या
: ग्रामस्तरीय नोडल अधिकारी हा पीएम किसान योजनेच्या सर्व समस्यांसाठी एकच संपर्क
बिंदू असेल. शंभर टक्के भूमी अभिलेख नोंदी करणे, ई-केवायसी करणे, बँक खाती आधार संलग्न
करणे, आधार सिडींग करण्यासाठी इंडियन पोस्टल पेमेंट बँक व सामाईक सुविधा केंद्र यांच्याशी
समन्वय साधणे. पीएम किसान साठी गावातील नवीन पात्र लाभार्थ्यांचा शोध घेऊन नोंदणी करणे.
फेस ॲथंटीकेशन ॲपद्वारे सर्व प्रलंबित शेतकऱ्यांची ई-केवायसी करणे. केवायसी मॉड्यूलद्वारे
शेतकऱ्यांच्या शंका व तक्रारी सोडविणे. सर्व नोंदणीकरण शेतकऱ्यांच्या जमिनीच्या तपशीलाची
पडताळणी करणे. ही सर्व कामे करुन घेण्यासाठी ग्रामस्तरीय नोडल अधिकारी यांना प्रोत्साहन
निधी देण्यात येणार आहे.
वरील प्राप्त निर्देशानुसार
दि. 6 डिसेंबर, 2023 ते दि. 15 जानेवारी, 2024 या कालावधीमध्ये संपृक्तता मोहिम राबवावी.
गावातील पीएम किसान योजनेच्या निकषांप्रमाणे पात्र लाभार्थी पीएम किसान योजनेच्या लाभापासून
वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
यांनी संबंधितांना दिले आहेत.
*******
No comments:
Post a Comment