22 December, 2023

 

हिंगोली जिल्ह्यात प्रथमच घेण्यात आले

एचआयव्ही संसर्गित महिलांचे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबीर

 


* जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांचा अभिनव उपक्रम

* डॉ. संदीप शिंदे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन

 

हिंगोली (जिमाका), दि. 22 : जिल्हा रुग्णालयात असलेला जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग हा इतर जिल्ह्याच्या तुलनेत खूप चांगले काम करत आहे. या विभागातर्फे नवनवीन उपक्रम राबविण्यात येत आहेत. या विभागात आजपर्यंत एकूण 4 हजार 240 एचआयव्ही रुग्णांची नोंदणी झालेली असून यात एकूण 275 गरोदर महिला आहेत. एचआयव्ही संसर्गित असलेल्या सर्व रुग्णांना एआरटी केंद्रामार्फत मोफत उपचार देण्यात येतो. परंतु त्यांना इतर कोणतेही ऑपरेशन (शस्त्रक्रिया)  करण्यासाठी ग्रामीण किंवा जिल्हा रुग्णालयात असणारे अपुरे मनुष्यबळ व अपुरी साधनसामग्री इत्यादीमुळे वैद्यकीय महाविद्यालय नांदेड किंवा इतर ठिकाणी रेफर करावे लागत असे.

बऱ्याच दिवसांपासून या महिलांचे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक व विहान संस्था हे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे मागणी करत होते. परंतु काही महिन्यापूर्वीच रुजू झालेले जिल्हा चिकित्सक डॉक्टर नितीन तडस यांच्याकडे जेव्हा या शिबिराची मागणी करण्यासाठी अलका रणवीर व जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी यांनी भेट घेतली, त्यावेळी डॉक्टर नितीन तडस यांनी क्षणाचाही विलंब न लावता शिबिराच्या माध्यमातून हा अभिनव उपक्रम राबविण्यास तयारी दाखवली व उपजिल्हा रुग्णालय कळमनुरी येथे शिबीर घेण्याचे संबंधितांना आदेश दिले. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपक मोरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.कुऱ्हाडे, डॉ.करवा, डॉ.आनंद मेने यांनी शिबिरासाठी योग्य नियोजन करुन डॉक्टर व इतर स्टाफ उपलब्ध करुन दिला. 

कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दिनांक 22 डिसेंबर रोजी हे शिबिर घेण्यात आले. या शिबिरात सर्जन डॉ. संदीप शिंदे यांनी यावेळी सात महिलांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केली. यावेळी त्यांना भूलतज्ञ डॉ. माहोरे यांनी मदत केली. डॉ. संदीप शिंदे यांनी दाखवलेल्या धाडसामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपक मोरे व जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी यांनी शिबिराला भेट देऊन सर्व डॉकटर व कर्मचारी यांचे अभिनंदन केले. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस व सर्व टीमचे अभिनंदन केले.

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी, समुपदेशक आनंद चारण, चंद्रकांत कोलते, श्रीमती बेंगाल, विहानच्या समन्वयक अलका रणवीर, शिला रणवीर व त्यांची टीम यांनी सहकार्य केले.

******

No comments: