07 December, 2023

 

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून गावोगावी शासकीय योजनांचा जागर

 

* जिल्ह्यात 563 ग्रामपंचायतींमध्ये उपक्रमाचे नियोजन

* आतापर्यंत 109 गावांमध्ये पोहचली संकल्प यात्रा

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 07 : केंद्र शासनाच्या विविध योजना समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहचाव्यात, तसेच त्यांना या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही विशेष मोहीम  24 नोव्हेंबर ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत हिंगोली जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील 563 ग्रामपंचायतींमध्ये चित्ररथाद्वारे शासकीय योजनांची माहिती दिली जात असून लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण, नाव नोंदणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 109 गावांमध्ये ही संकल्प यात्रा पोहचली असून 26 हजार 673 नागरिकांनी यामध्ये सहभाग नोंदविला आहे.

              ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषद आणि शहरी भागासाठी नगर विकास विभाग ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ समन्वयक म्हणून काम करीत आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये यात्रेच्या स्वागतासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक तालुक्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

              विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशन, आयुष्मान भारत योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, स्वच्छ भारत मिशन, कृषि विभागाच्या योजना, माय भारत, धरती कहे पुकार के आदी योजनांची माहिती देण्यात येत आहे. तसेच लाभार्थ्यांच्या यशोगाथा दाखविण्यात येत असून या योजनांच्या लाभार्थ्यांचा सन्मान करणे, त्यांना लाभाचे वितरण करणे, वंचित लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येत आहे.

8 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील दहा गावात जाणार संकल्प यात्रा

                जिल्ह्यातील ग्रामीण भागात विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. ही यात्रा 8 डिसेंबर, 2023 रोजी हिंगोली जिल्ह्यतील 10 गावात जाणार आहे. त्याचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे.

              हिंगोली तालुक्यात सावा येथे सकाळी, नवलगव्हाण येथे सायंकाळी जाणार आहे. कळमनुरी तालुक्यात सकाळी उमरा,  सायंकाळी जांभरुण येथे, औंढा नागनाथ तालुक्यात सकाळी सारंगवाडी आणि सांयकाळी संघनायक तांडा येथे, सेनगाव तालुक्यात सकाळी जवळा बु. आणि सायंकाळी सुलदळी बु. येथे तर वसमत तालुक्यात सकाळी डोणवाडा व सायंकाळी सुकळी येथे ही विकसित भारत संकल्प यात्रा जाणार आहे.

*******

No comments: